बंदवरुन मनसेचा पवार अन् मुख्यमंत्र्यांना टोला; “मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन मोदींशी गुलूगुलू बोलणार, मग जनतेला का वेठीस धरतात?

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 11, 2021 | 13:19 IST

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे.

Maharashra Bandh : MNS's attacks on Pawar  and CM
महाराष्ट्र बंदवरुन मनसेचा पवार अन् मुख्यमंत्र्यांना टोला  |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • पोलीस चहावाल्यांना दुकाने बंद करण्यास सांगत आहेत.
  • संसदेत कायदा पास होत होता त्यावेळेस महाविकास आघाडीतील खासदार शेपटी घालून का गप्प होते.
  • मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन मोदींशी गुलूगुलू बोलणार. तुमचे संबंध तुम्ही चांगले ठेवणार आणि राजकारणासाठी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरणार का?- संदीप देशपांडे

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. मात्र या बंदला भाजपाने विरोध केला आहे. असं असतानाच आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही या बंदला विरोध दर्शवला आहे. बंदवरुन मनसेने सरकारवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान महाराष्ट्र बंदला विरोध करणाऱ्यावर शिवसेना नेते संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी तोंडसुख घेतलं आहे. बंद मोडून काढणारे मुर्ख असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. यावरुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे जोरदार प्रतित्त्युर दिलं आहे. 

राजकारणासाठी महाराष्ट्राच्या जनतेला का वेठीस धरले जात आहे, असा प्रश्न मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. “उत्तरप्रदेश येथील लखीमपूर खेरी येथे झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे त्याचा विरोध झालाच पाहिजे. पण ज्या वेळेस संसदेत कायदा पास होत होता त्यावेळेस महाविकास आघाडीतील खासदार शेपटी घालून का गप्प होते. त्यावेळेस त्यांनी लोकसभेत का नाही आवाज उठवला. शरद पवार त्यावेळेस संसदेत का नव्हते?,” असा प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

“ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. महाराष्ट्रातील जतना कोरोनामुळे आधी त्रस्त आहे. तुम्ही पुन्हा जनतेला सणासुदीच्या काळात वेठीस धरून कंबरडे मोडताय जर तुम्हाला निषेध करायचा आहे तर एक दिवसीय विधानसभेचे अधिवेशन बोलवा. निषेधाचा ठराव मांडा, चर्चा घडवा, असाही निषेध होऊ शकतो. तुम्हाला जनतेलाच का वेठीस धरायचे आहे. मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन मोदींशी गुलूगुलू बोलणार. तुमचे संबंध तुम्ही चांगले ठेवणार आणि राजकारणासाठी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरणार का?”, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे

आमच्या काही ओळखीतील चहावाल्यांना दुकान बंद करण्यास पोलिसांनी सांगितले असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. “चहावाल्यांना बंद करण्याचे काम पोलीसच करत आहेत. पोलीस प्रशासनाचे आहेत की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत?” असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी