लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद; मुंबईत 8 बसेसची तोडफोड, बेस्टकडून पोलीस संरक्षणाची मागणी, कुठे विरोध तर कुठे आहे पाठिंबा?

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 11, 2021 | 09:32 IST

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Maharashtra bandh today in protest of Lakhimpur incident
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज्यातील सर्व घटकांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे, महाविकास आघाडीकडून आवाहन
  • राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे, - संजय राऊत
  • 'मुंबई डबेवाला असोसिएशन'ने या बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे.

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यातील सर्व घटकांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर ११ ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आज मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद राहणार आहेत.

सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मात्र विविध शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ३ पक्षांनी पुकारलेल्या या बंदला विविध शहरांतील व्यापाऱ्यांनी मात्र आक्रमकपणे विरोध दर्शवला आहे. तर 'मुंबई डबेवाला असोसिएशन'ने या बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. त्या घटनेत निधन झालेल्या व्यक्तींना मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यादिवशी अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व दिवसभर बंद राहिल अशी माहिती मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर यांनी दिली होती.  हा बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं. तर शेतकऱ्यांचा पाठीशी शिवसेना नेहमी राहिली आहे, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. शेतकरी आंदोलन चिरडताना भाजपची मानसिकता दिसून आली, जनरल डायरच्या भूमिकेत भाजप दिसून आली, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते.  

MNS on Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदला मनसेचा तीव्र विरोध

महाविकास आघाडीने शेतकरी हल्ल्याविरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील  मित्रपक्षांनी सहभाग नोंदवला आहे. मात्र भाजप आणि मनसेने  या बंदला तीव्र विरोध केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. संसदेत शेतकरी कायदा बिल पास होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? शिवसेना खासदारांची थोबाडं बंद का होती ? पवारसाहेब संसदेत अनुपस्थित होते, त्याचे कारण काय? असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले.

किसान सभेचा महाराष्ट्र बंदला सक्रिय पाठिंबा

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या अखिल भारतीय शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाचा समावेश असणाऱ्या वाहन ताफ्याने चिरडून मारले. सबंध देशभर जनतेमध्ये या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. विविध पक्ष व संघटनांनी महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने या बंदला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. 

महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा 

महाविकासआघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राखा यांनी ही माहिती दिली. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची अनेक संघटना असलेल्या रिटेल व्यापारी संघाने मात्र उद्याच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून ते काम सुरूच ठेवणार असल्याचं रिटेल व्यापारी महासंघाकडून सांगण्यात आले आहे.  फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशन (FRTWA) नं देखील बंदला पाठिंबा दिला आहे, दुपारी चार वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवणार आहे. FRTWA चे अध्यक्ष वीरेन शाह यांनी ही माहिती दिली आहे.

स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनकडून बंदला विरोध

'आतापर्यंत जे बंद झाले त्यास कधीही सरकारने दुजोरा दिला नाही. आता आपल्याच पार्टीचे सरकार आहे. तरी कृपया महाराष्ट्रातील तमाम जनतेला बंद करून वेठीस धरू नका. सरकार आपलेच आहे, पोलीसही आपलेच आहेत आणि बंद देखील आपल्याच सरकारमधील तिन्ही पक्षांनी केला आहे .आतापर्यंतच्या अनुभवानुसार सरकार बंद हाणून पाडते. परंतु ह्या खेपेस बंद पुकारणारेच बंदची अंमलबजावणी करणार? आम्ही दाद कोणाकडे मागायची? आधीच नुकसानग्रस्त असताना सगळ्यांना मदतीची गरज असताना बंद पुकारणे योग्य नाही. शेतकऱ्यांपासून लघुउद्योग, व्यापारी व ज्यांचे हातावर पोट आहे या सर्वांना नुकसान भरपाई कोण देणार?' असा उद्विग्न सवालही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनकडून उपस्थित करण्यात आला आहे.
 

अभिनेते सयाजी शिंदे यांचा बंदला पाठींबा

अभिनेता सयाजी शिंदे यांनी लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला असून उद्याच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

नागपूर येथील व्यापाऱ्यांचा विरोध

उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या हाकेला नागपूर येथील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने आम्हाला उद्याचा बंद पाळता येणार नाही, असं जाहीर केले आहे. सणासुदीचे दिवस असून एक दिवसही बाजार बंद ठेवणे कठीण आहे, एक दिवस दुकान बंद असले तरी ग्राहक ऑनलाईनचे पर्याय निवडत आहेत, त्यामुळे ज्यांना या समर्थनात बंद ठेवायचे आहे, त्यांनी ठेवावे, पण ज्यांचा या बंदला पाठिंबा नाही त्यांचे दुकान जबरदस्तीने बंद ठेवू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी आशा नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी व्यक्त केली.

मुंबईच्या डबेवाल्यांचा बंदला पाठिंबा 


'उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा मुंबई डबेवाला असोसिएशन निषेध करत आहे. भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने त्याची कार आंदोलक शेतकऱ्यांवर चढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री तिथे आपला मुलगा नव्हता, असा दावा करत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरण वाढत असल्याचे पाहून या मंत्रीपुत्रावर गुन्हा दाखल केला आहे. पण ८ जणांचा मृत्यू झालेला असला तरी देखील म्हणावा तसा तपास पोलिसांनी केलेला नाही. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे. या महाराष्ट्र बंदला मुंबई डबेवाला असोसिएशन जाहीर पाठिंबा देत आहे,' अशी भूमिका डबेवाल्यांच्या संघटनेकडून मांडण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी