चिंता नको, परप्रांतियांना मुख्यमंत्र्यांचा आवाहन, उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 14, 2020 | 22:13 IST

कोरोनामुळे देशात 3 मेपर्यंत वाढलेला लॉकडाऊन आणि वांद्र्यात उसळलेल्या जीवघेण्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला.

 Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray
चिंता नको, परप्रांतियांना मुख्यमंत्र्यांचा आवाहन, उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला.
  • यावेळी त्यांनी बाहेर राज्यातील नागरिकांना चिंता न करण्याचं आवाहन केलं.
  • कोरोनाशी कशा पद्धतीने मुकाबला सुरु आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबईः  कोरोनामुळे देशात 3 मेपर्यंत वाढलेला लॉकडाऊन आणि वांद्र्यात उसळलेल्या जीवघेण्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाहेर राज्यातील नागरिकांना चिंता न करण्याचं आवाहन केलं. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजन करत आहे, याची माहिती उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली.  राज्यातील उद्योगधंदे सुरु करण्याबाबत 20 एप्रिलनंतर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वैद्यकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची माहिती असणाऱ्यांनी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. कोरोनाशी कशा पद्धतीने मुकाबला सुरु आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

केंद्र आणि राज्याने लॉकडाऊन वाढवला आहे पण यात काही आम्हाला आनंद नाही. आपल्याला घरी जाण्याची ओढ असणे स्वाभाविक आहे पण थोडा संयम ठेवा, राज्य सरकार तुमची संपूर्ण काळजी घेत आहे, आणखीही काही यासाठी करावे लागले तर केले जाईल मात्र कुणी या लढाईमध्ये राजकारण करून गैरसमज पसरवू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला सांगितलं. ते म्हणाले की कोरोनाचा मुकाबला करण्यात केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य देत असून विविध पक्षांचे नेतेही बरोबर आहेत.

मजुरांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन

वांद्रे येथे दुपारी परराज्यातील कामगार, मजूर यांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली होती त्याचा उल्लेख आज मुख्यमंत्र्यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, रेल्वे  सुरु होणार अशा अफवेने लोक जमले. मात्र अस्वस्थ होण्यासारखे काही नाही. तुम्ही आपल्या राज्यात नसलात तरी आपल्याच देशात आहात आणि तुमची संपूर्ण काळजी घेतली जाईल. या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणी भावनांशी खेळण्याचे राजकारण केले तर सहन केले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन केले. तसेच लाखो भीमसैनिक आणि नागरिकांनी देखील घरात राहूनच या महामानवाला अभिवादन केले. कुठेही गर्दी केली नाही आणि एरव्ही मोठ्या धुमधडाक्यात साजरा करणारी ही जयंती आपण साधेपणाने साजरी केली त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा दिला आणि आज आपण विषाणूंशी लढा देतो आहोत असेही ते म्हणाले.

देशातील लॉकडाऊन 3 मे रोजीपर्यंत 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज सकाळी पंतप्रधानांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला. शनिवारीच मी याची मुदत वाढवली. हा लढा अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता. सर्व जनतेने जिद्द, संयमाचे दर्शन आतापर्यंत घडवले आहे आणि पुढेही आपण घडवाल अशी खात्री आहे. 

मुंबईत 20 ते 22 हजार चाचण्या 

एकट्या मुंबईत 20 ते 22 हजार चाचण्या झाल्या आहेत. 230 जणांवर आपण उपचार करून पाठवले आहे. 32 गंभीर आहेत पण त्यांच्या तब्येती स्थिर आहेत. एका 6 महिन्याच्या बाळाच्या आईशी आणि 83 वर्षांच्या एका कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेशी मी आज सकाळी बोललो. दोघांनीही कोरोनाला हरवले आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले.

जवळपास 10 जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा प्रवेश झाला नाही. उर्वरित राज्यातून त्याला हद्दपार करायचे आहे. मुंबई -पुण्यात चाचण्यांची संख्या वाढवतो आहोत. बाधित क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काही झोन्समध्ये थोडी गैरसोय झाली असेल पण ती तात्पुरती आहे, आपण अन्नधान्याचा पुरवठा सुरळीतपणे सुरु केला असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

 टास्क फोर्स राज्यातील डॉक्टर्सना मार्गदर्शन करणार
 
आज जगभर टंचाई आहे पण वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा वाढविण्याचा आमचा  प्रयत्न सुरु आहे. अनेक व्यक्ती, संस्था आपल्याला मदत करताहेत. कुणी पीपीई कीट देताहेत, कुणी व्हेंटिलेटर देताहेत. वैद्यकीय क्षेत्रातील 21 हजार लोकांनी आमच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता तर या युद्धात सर्व नामवंत डॉक्टर्स आमच्या बरोबर सहभागी झाले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टर्सचा टास्क फोर्स राज्यातील डॉक्टर्सना मार्गदर्शन करणार आहे.

मालेगावमध्ये राहणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना मी या आजच्या निमित्ताने विनंती करतो की कृपया प्रशासनाला सहकार्य करा, तुम्हालाही या कोरोनाने किती मृत्यू जगभर झालेत त्याची कल्पना आहे. मी मुल्ला , मौलवी यांच्याशीही बोलतोय. मी सांगू इच्छितो की हा रोग जात पात धर्म पाहत नाही. तुम्ही संकटात पडू नका आणि दुसऱ्यांना पाडू नका. प्रशासन तुमच्या चांगल्यासाठीच सांगते आहे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आज उद्योग- व्यवसाय प्रदीर्घ काळासाठी बंद करणे अर्थव्यवस्थेवर ताण आणण्यासारखे आहे. जिथे कोरोनामुळे बिकट परिस्थिती नाही अशा जिल्ह्यांत ज्या उद्योग , व्यवसायांना त्यांचे कामगार एकाच ठिकाणी ठेऊन, त्यांना तिथेच भोजन व्यवस्था देता येण्यासारखी असेल ते करणे शक्य असेल तर उद्योग सुरूही करता येतील असंही मुख्यमंत्री म्हणालेत. 

कोविडच्या बरोबरीने आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गट स्थापन केला आहे. डॉ रघुनाथ माशेलकर, अजित रानडे, दीपक पारेख, विजय केळकर यांची देखील एक समिती स्थापन केली आहे . कमीतकमी आर्थिक दुष्परिणाम कसे टाळायचे , पुढील आर्थिक आघाडीवर कसे काम करायचे आहे तेही समिती पाहणार आहे.

20 एप्रिलनंतर कोणते उद्योग व्यवसाय सुरु करता येतील त्याचा निर्णय घेण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचा खरीपाचा हंगाम येतो आहे. शेतीविषयक कामे , बियाणे-अवजारे यांची ये-जा थांबवणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहील  अर्धा एप्रिल संपला आहे. दीड महिन्यांनी पाऊस सुरु होईल. पावसाळ्यात दुर्गम भागात जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, औषधे पुढच्या 15-20 दिवसांत पोहचावा असे निर्देश दिलेत मग त्यात गडचिरोली , अक्कलकुवा, मेळघाट असेल अशी माहितीही त्यांनी दिली.

सध्या परराज्यातून आलेल्या कामगार आणि विविध उद्योगांतून काम करणारे श्रमिक अशा 5 लाख 44 हजार व्यक्तींची राज्य सरकारने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. एकूण 4 हजार 346 निवारा केंद्रे उभारली असून त्यातून त्यांना दोन वेळेसचे भोजन आणि सकाळचा नाश्ता दिला जातो. शिवाय त्यांच्यासाठी डॉक्टर ही नियुक्त केले आहेत. त्यांच्यातील नैराश्य कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. तर राज्यात 13 दिवसात 1.25 कोटी कुटुंबांनी (80 टक्क्यांपेक्षा अधिक) धान्य खरेदी केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी