उद्धव ठाकरेंनी घेतली शपथ, मुख्यमंत्री आता आमदारही झाले!

मुंबई
रोहित गोळे
Updated May 18, 2020 | 14:41 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. त्यामुळे आता ते विधानपरिषदेचे सभासद झाले आहेत.

maharashtra chief minister uddhav thackeray takes oath as member of legislative council
उद्धव ठाकरेंनी घेतली शपथ, मुख्यमंत्री आता आमदारही झाले!  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ
 • विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची झाली होती बिनविरोध निवड
 • उद्धव ठाकरे यांच्यासह ९ आमदारांनी घेतली शपथ

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधीमंडळात आमदारकीची शपथ घेतली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे अधिकृतरित्या आमदार झाले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानंतर आज (सोमवार) विधिमंडळात विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंना शपथ दिली. यावेळी काही मोजके लोकच उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी देखील शपथ घेतली. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना आमदार होण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांना विधानसभा किंवा विधानपरिषद यावर निवडून जाणं गरजेचं होतं. मात्र, अचानक उद्भवलेल्या कोव्हिड-१९ च्या संसर्गामुळे सर्व निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यात यावं अशा प्रस्ताव मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केला होता. मात्र, राज्यपालांनी हा प्रस्ताव फेटाळला होता. यावरुन बरंच राजकारण देखील झालं. अखेर राज्यापालांनी निवडणूक आयोगाला विधानपरिषदेच्या रिक्त जागांवर निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्यानंतर १४ मे रोजी यासाठी निवडणूक पार पडली. यावेळी ही निवडणूक बिनविरोध झाली त्यामुळे उद्धव ठाकरेंची आमदार म्हणून निवड झाली. यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर जो पेचप्रसंग उद्भवला होता तो सोडविण्यात त्यांना यश आलं. 

१४ मे रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने उर्वरित सर्व उमेदवार हे बिनविरोध निवडून आले होते. 

विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी दाखल १४ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या दिवशी १३ उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भारतीय जनता पार्टी), संदीप सुरेश लेले (भारतीय जनता पार्टी), किरण जगन्नाथ पावसकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), शिवाजीराव यशवंत गर्जे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) या चार उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले होते.

विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे

 1. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना),
 2. डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना)
 3. गोपीचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी),  
 4. प्रवीण प्रभाकरराव दटके (भारतीय जनता पार्टी),   
 5. रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भारतीय जनता पार्टी),  
 6. रमेश काशिराम कराड (भारतीय जनता पार्टी).
 7. शशिकांत जयवंतराव शिंदे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी),   
 8. अमोल रामकृष्ण मिटकरी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी).
 9. राजेश धोंडीराम राठोड (इंडियन नॅशनल काँग्रेस). 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी