मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde group) आणि भाजप (BJP) यांनी मिळून सत्ता स्थापन केली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी सुरू असतानाच आता एका व्हायरल झालेल्या फोटोने सर्वांनाच चक्रावून सोडलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीचा फोटो व्हायरल (Eknath Shinde and Sharad Pawar meeting photo viral) झाला अन् चर्चांना उधाण आले. अनेक माध्यमांनी या संदर्भात वृत्त सुद्धा दिले. त्यानंतर स्वत: एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबत खुलासा केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शरद पवारांसोबतच्या भेटीबाबतचा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.....#MaharashtraFirst — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 6, 2022
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक ट्विट करत जुन्या भेटी दरम्यानचा हा फोटो असल्याचं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची 11 नोव्हेंबर 2021 रोजी भेट घेतली होती. शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी ही सदिच्छा भेट झाली होती असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
या भेटी दरम्यानचा हा फोटो आहे… pic.twitter.com/vMAMIcTjfL — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 6, 2022
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली. पण अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांच्या गटाने बंड पुकारले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली. राज्यात घडलेल्या या घडामोडींदरम्यान शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. पण आता स्वत: एकनाथ शिंदे यांनी या व्हायरल फोटो बाबत खुलासा केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.