Uddhav Thackeray : .... तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे.

Breaking News
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे LIVE 
थोडं पण कामाचं
  • राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद
  • ऑनलाईन माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे ऑनलाईन माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेसोबत संवाद साधणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र काही तांत्रिक कारणास्तव या लाईव्हला उशीर झाला आणि त्यानंतर हे लाईव्ह पाच वाजून ३५ मिनिटांच्या आसपास सुरू झालं.

काय म्हणाले मुख्यमंत्री? 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोविडच्या काळात जे काही काम करायचं ते प्रामाणिकपणे मी काम केलं. त्या दरम्यानच्या काळात जे काही सर्व्हे होत होते त्यानुसार देशातील टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश झाला.

गेल्या काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे का? बाळासाहेबांची शिवसेना आता कुणाची? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाला भेटत नाहीत? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. शिवसेना कदापी हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व कदापी शिवसेनेपासून दूर जाऊ शकत नाही. शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

२०१४ च्या निवडणुकीत आपण एकट्याच्या ताकदीवर लढलो होतो. त्यावेळी सुद्धा ६३ आमदार शिवसेनेने निवडून आणले. माझ्यासोबत आता मंत्रिमंडळात असलेले नेते, आमदार हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचेच आहेत. मधल्या काळात जे मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं. बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहे. ज्यांना आपण आपले मानतो, मरमर राबतो आणि आपली माणसं एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ही कुठली लोकशाही आहे. लघूशंकेला गेलेल्या आमदारांवरही पाळत ठेवता ही कसली लोकशाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवार, सोनिया गांधी यांनी विश्वास ठेवला आणि कुठलाही राजकीय अनुभव नसताना मला मुख्यमंत्री पदावर बसवलं. शरद पवारांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पद स्वीकारलं.

मला दु:ख कशाचं झालं आहे, मला धक्का कसला बसला.... सत्तेसाठी आपण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत एकत्र आलो. कमलनाथ, शऱद पवार यांनी मला फोन करुन आपण तुमच्यासोबत असल्याचं म्हटलं. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको तर काय करायचं? सुरतला जाऊन बोलायची गरज काय? मी त्यांना आपलं मानतो, ते मला मानतात की नाही हे माहिती नाही. कारण ते माझ्यासमोर आता नाहीयेत. तुम्ही इथे येऊन बोलायला काय हरकत होती. सरळ इथे येऊन सांगायचं होतं आम्हाला तुम्ही मुख्यमंत्रिपदावर नकोत. आजही सांगतो, त्यापैकी एकाही आमदाराने मला सांगितलं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर नकोत तर मी आत्ता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. विश्वास नसेल तर आज संध्याकाळी लाईव्ह झाल्यावर मी माझा मुक्काम मातोश्रीवर हलवतो. पण हे सर्व माझ्या समोर येऊ द्यात. मी शिवसेनाप्रमुखांचा पूत्र आहे. कोणताही मोह मला अडवू शकत नाही. हे सर्व करण्यावर नुकसान कोणाचं होत आहे? असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी