'मागचं कशाला बोलायचं, आता आपण...', पाहा अजित पवार काय म्हणाले!

मुंबई
रोहित गोळे
Updated Jan 02, 2020 | 14:06 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पाहणी केली. त्याचवेळी त्यांनी  अत्यंत महत्त्वाची विधाने देखील केली.

maharashtra deputy chief minister ajit pawar on indu mill babasaheb smarak
'मागचं कशाला बोलायचं, आता आपण...', पाहा अजित पवार काय म्हणाले!   |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (गुरुवार) मुंबईतील इंदू मिल येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केलं की, हे स्मारक १४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण झालेलं असेल. दरम्यान, याचवेळी पत्रकारांनी या स्मारकाबाबत मागील सरकारशी निगडीत काही प्रश्न विचारले त्यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांना तात्काळ उत्तर दिलं की, 'मागचं कशाला बोलायचं, आता आपण पुढचं बोलूयात. मी काही इथे ऑडिट करायला आलेलो नाही.' असं म्हणत त्यांनी मागील सरकारच्या निर्णयांबाबत बोलण्यास नकार दिला. 

इंदू मिल परिसरातील स्मारकाची ठेवण्यात आलेली प्रतिकृती पाहून अजित पवार यांनी काही बदल देखील सुचवले आहे. पण ते याबाबत आधी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाशी देखील चर्चा करण्यात आहेत. याविषयी बोलताना ते असं म्हणाले की, 'स्मारकाच्या कामाला काहीही अडचणी येणार नाही. या स्मारकासाठी जो काही आणि जितका निधी लागेल तो आम्ही उपलब्ध करुन देऊ. यासंबंधी मंत्रिमंडळाशी चर्चा करुन याच महिन्यात कामाची परवानगी देण्याबाबत देखील निर्णय घेतला जाईल. त्यामुळे १४ एप्रिल २०२२ पर्यंत या स्मारकाचं काम होईल.' 

'२०१५ मध्ये या स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं होतं. मात्र, आता आमच्या सरकारला संधी मिळाली आहे की, हे स्मारक पूर्ण करावं. या स्मारकासाठी महत्त्वाच्या अशा सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. ज्या काही परवानग्या शिल्लक आहेत त्या राज्य सरकारच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे त्या मिळविण्यासाठी फार अडचणी येणार नाहीत.' 

इंदू मिल येथे बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं अशी मागणी गेले अनेक वर्ष सुरु आहे. भाजप सरकारच्या काळात या कामाला परवानगी मिळाली. मात्र, म्हणावं तसं काम प्रत्यक्षात सुरु झालं नाही. आता हे सरकार तरी हे संपूर्ण स्मारक पूर्णत्वास नेणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी