मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती (Agricultural schemes) तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हॉटसॲप (Whatsapp) आणि ब्लॉग (Blog) या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे सांगितले. राज्यात सुमारे ९ कोटी ३७ लाख मोबाईलधारक असल्याची बाब लक्षात घेवून कृषी विस्तार कार्यामध्ये हया बाबीचा फायदा होवू शकतो हे लक्षात घेऊन व्हाटसॲपव्दारे कृषी विषयक योजना व अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक माहिती मिळावी म्हणून ऑटो रिप्लायची सुविधा तयार करण्यात आली आहे.
मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता ब्लॉग आणि व्हाटस्ॲपचा वापर करण्यात येत आहे.
मोबाईलवरून ८०१०५५०८७० या व्हाटस्ॲप क्रमांकावर ‘नमस्कार’ किंवा ‘हॅलो’ शब्द टाईप करून पाठविणाऱ्या व्यक्तिस स्वागत संदेश प्राप्त होतो. ज्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द (की वर्डस्) दिले आहेत. ते टाईप करून या व्हाटस्ॲप क्रमांकावर पाठविल्यावर शेतकऱ्याला हव्या त्या योजनेची माहिती मिळते.
सध्या या उपक्रमात कृषी विभागाच्या जवळपास २७ योजनांचा समावेश केला असून त्यात कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचाही समावेश करून त्यांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
विभागामार्फत योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी krushi-vibhag.blogspot.com हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे कृषी योजनेची व्याप्ती, लाभार्थी, निकष अनुदान व अर्ज कुठे करावा याबाबत माहिती देण्यात आली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.