Covid-19 new guidelines: राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर, पाहा काय आहेत नवे नियम

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 27, 2021 | 21:21 IST

Covid-19 new guidelines in Maharashtra: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली लागू

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
 • आज मध्यरात्रीपासून नवी नियमावली लागू

Covid-19 new guidelines in Maharashtra: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. राज्यातील कोविडचा संसर्ग थोपवण्यासाठी १५ एप्रिल २०२१ पर्यंत काही निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या नियमावलीनुसार, ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत सागरी किनारे, उद्याने, बागा बंद राहतील तर सर्व एक पडदा व मल्टिप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ बंद राहतील. या वेळेत टेक होम डिलिव्हरी सुरू राहील.

काय आहेत मार्गदर्शक सूचना

 1. सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य 
 2. मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड 
 3. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य 
 4. ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत एकत्र येण्यास मनाई आहे. 
 5. पाचहून अधिक व्यक्ती एकत्र आल्यास १००० रुपये दंड
 6. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड 
 7. रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत सागरी किनारे, उद्याने, बागा बंद राहतील
 8. सर्व एक पडदा व मल्टिप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ बंद राहतील. या वेळेत टेक होम डिलिव्हरी सुरू राहील.
 9. गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला
 10. अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकणार नाहीत 
 11. विवाह समारंभासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल 
 12. कुठलेही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, मेळाव्यांना परवानगी नाही. सभागृह नाट्यगृहे या कारणांसाठी उपयोगात आणता येणार नाही.
 13. होम आयसोलेशनच्या बाबतीत उपचार करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायिकाची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी लागेल.
 14. कोविड रुग्ण असल्याबाबत संबंधित स्थळी दरवाज्यावर १४ दिवसांसाठी तसा सूचना फलक लावण्यात येईल. 
 15. गृह विलगीकरण शिक्काही रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल.
 16. खासगी आस्थापनांत (आरोग्य व आवश्यक सेवा वगळून) ५० टक्क्यांपर्यंत कर्मचारी उपस्थित ठेवता येतील. तर शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विभाग किंवा कार्यालय प्रमुख कोविड परिस्थितीनुसार कर्मचारी संख्या निश्चित करतील. उत्पादन क्षेत्र मात्र पूर्ण क्षमतेने काम सुरू ठेवू शकते. 
 17. शासकीय कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवश्यक आणि तात्काळ कामांसाठीच प्रवेशाची परवानगी देण्यात येईल.
 18. बैठका आधी कामासाठी निमंत्रित केले असल्यास विशेष प्रवेश पास कार्यालयमार्फत दिला जाईल हे कार्यालय विभाग प्रमुखाने पहावे.
 19. सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने दर तासाला कमाल किती भाविक असावेत ते निश्चित करावे. 
 20. त्या ठिकाणी वावरण्यास पुरेशी जागा व आरोग्याचे नियम पाळले जात आहेत किंवा नाहीत ते सुनिश्चित करावे.
  ऑनलाईन आरक्षणावर भर द्यावा.

२८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी 

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (२८ मार्च २०२१) रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. 

लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोट्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी