Maharashtra government will take decision about school reopening मुंबईः राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय आधी जिल्ह्यांच्या पातळीवर प्रशासनाच्या हाती दिला होता. यातून निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासन बुधवार १५ डिसेंबर २०२१ रोजी बैठक घेणार आहे. या बैठकीत शासन राज्यातील शाळा सुरू करायच्या की नाही या संदर्भातला निर्णय घेईल. ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये शाळा सुरू आहेत तर काही ठिकाणी शाळा बंद आहेत. राज्यात शाळांबाबतच्या निर्णयावरुन गोंधळाची स्थिती आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी तसेच राज्यभरातील शहरी आणि ग्रामीण शाळांसंदर्भात सरसकट निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर बैठक होणार आहे. राज्याचे मंत्रिमंडळ बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळांबाबतचा निर्णय घेईल, असे अजित पवार म्हणाले.
नाशिक शहरातील महापालिकेच्या हद्दीतील शाळा सोमवार १३ डिसेंबर २०२१ पासून सुरू होणार आहेत. औरंगाबाद महापालिकेने १५ डिसेंबर नंतर निर्णय घेऊ असे आधीच जाहीर केले होते. आता राज्य शासनाचा निर्णय बुधवारी जाहीर झाला तर तोच राज्यभर लागू होईल.
औरंगाबाद जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत मागे आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात बुधवार १५ डिसेंबर २०२१ पासून दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लस घेतली नसल्याचे आढळल्यास त्यांना १५ दिवसांसाठी ५०० रुपये याप्रमाणे दंड आकारला जाईल. हा निर्णय औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम होईल आणि दुसऱ्या डोससाठी पात्र असलेले लवकर लसीकरण पूर्ण करतील, अशी आशा अजित पवार यांनी व्यक्त केली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.