Mumbai Local सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा रेल्वेला प्रस्ताव सादर, पाहा कसा आहे हा प्रस्ताव

Mumbai Local trains: मुंबई लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने रेल्वेला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्य सरकारकडून टप्प्या-टप्प्याने वेळेनुसार प्रवासाची मुभा देण्याची मागणी

Mumbai Local Train
मुंबई लोकल (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • राज्य सरकारकडून रेल्वेला प्रस्ताव सादर
  • गर्दीच्या वेळेस अधिक लोकल सुरू करण्याबाबत विनंती 
  • ठराविक वेळेनुसार प्रवासाची मुभा देण्याची विनंती

मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन (Mumbai local train) अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी ही लोकल ट्रेनची सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीये. मात्र, आता सर्वसामान्यांसाठी लोकलची सेवा लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण, राज्य सरकारने (Maharashtra government) आता रेल्वेला एक पत्र लिहिलं असून त्याद्वारे सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याबाबतची मागणी केली आहे. मात्र, अद्याप या पत्रावर रेल्वे विभागाकडून प्रतिक्रिया आलेली नाहीये. 

राज्य सरकारने रेल्वे विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ठराविक वेळेनुसार सर्वसामान्य नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा देण्यात यावी. तसेच राज्य सरकारकडून वेळेचा प्रस्तावही या पत्रामध्ये सादर करण्यात आला आहे. या वेळेपत्रकानुसार सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवासाची मुभा देण्यात यावी असं म्हटलं आहे. यासोबतच गर्दीच्या काळात जास्त लोकल ट्रेन्स सोडण्यात याव्यात असंही प्रस्तावात म्हटलं आहे.

असा आहे राज्य सरकारचा प्रस्ताव 

  1. सर्वसामान्य नागरिकांना पास किंवा तिकीटावर पहाटे पहिली लोकल ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत प्रवासाची मुभा
  2. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी क्यूआर कोड, पास, आयकार्डसह तिकीट सकाळी ८ ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत प्रवासाची 
  3. सर्वसामान्य नागरिकांना सकाळी ११ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत पास किंवा तिकीटावर प्रवास 
  4. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना संध्याकाळी ५ ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत प्रवास 
  5. सर्वसामान्य नागरिकांना रात्री ८ ते रात्री शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मागणी 
  6. लेडीज स्पेशल ट्रेन प्रत्येक तासाला एक

सर्वसामान्यांसाठी लोकलची सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीये. तुर्तास राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनाला केवळ प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेला हा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर रेल्वे मंडळाकडून प्रतिक्रिया आल्यावर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरू होणार याबाबत अधिकृत माहिती मिळू शकेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी