ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी ७९ टक्के मतदान

Maharashtra Gram Panchayat Election: राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काहींच्या निवडणुका बिनविरोध

Gram Panchayat Election voting
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : राज्यातील (Maharashtra) ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत (Gram Panchayat Election) प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७९ टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच व सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १६२ ग्रामपंचायतींसाठी २० जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. अशा विविध कारणांमुळे आज प्रत्यक्षात १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात २२ जानेवारी २०२१ रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होईल.

आज मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या १ लाख २५ हजार ७०९ जागांसाठी एकूण ३ लाख ५६ हजार २२१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर २ लाख ४१ हजार ५९८ उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी २६ हजार ७१८ उमेदवार बिनविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: २ लाख १४ हजार ८८० उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळत मतदान झाले. अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी मतदारांच्या रांगा होत्या. गडचिरोली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांत मात्र दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ होती, असेही राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय टक्केवारी (कंसात ग्रामपंचायतींची संख्या): ठाणे- १४३, पालघर- ३, रायगड- ७८, रत्नागिरी- ३६०, सिंधुदुर्ग- ६६, नाशिक- ५६५, धुळे- १८२, जळगाव- ६८७, नंदुरबार- ६४, अहमनगर- ७०५, पुणे- ६४९, सोलापूर- ५९३, सातारा- ६५२, सांगली- १४२, कोल्हापूर- ३८६, औरंगाबाद- ५७९, बीड- १११, नांदेड- १०१३, परभणी- ४९८, उस्मानाबाद- ३८२, जालना- ४४६, लातूर- ३८३, हिंगोली- ४२१, अमरावती- ५३७, अकोला- २१४, यवतमाळ- ९२५, वाशीम- १५२, बुलडाणा- ४९८, नागपूर- १२७, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६०४, भंडारा- १४५, गोंदिया- १८१ आणि गडचिरोली- १७०. एकूण- १२,७११.

ग्रामपंचायत निवडणूक एक दृष्टिक्षेप

  1. निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- १४,२३४
  2. आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- १२,७११
  3. एकूण प्रभाग- ४६,९२१
  4. एकूण जागा- १,२५,७०९
  5. प्राप्त उमेदवारी अर्ज- ३,५६,२२१
  6. अवैध नामनिर्देशनपत्र- ६,०२४
  7. वैध नामनिर्देशनपत्र- ३,५०,१९७
  8. मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- ९७,७१९
  9. बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- २६,७१८
  10. अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- २,१४,८८०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी