महाराष्ट्र: आरोग्य विभागाची परीक्षा रद्द; भाजपची राज्य शासनावर टीका

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Sep 25, 2021 | 02:27 IST

आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांची लेखी परीक्षा रद्द केल्याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

maharashtra health department exam abruptly cancelled
महाराष्ट्र: आरोग्य विभागाची परीक्षा रद्द; भाजपची राज्य शासनावर टीका 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र: आरोग्य विभागाची परीक्षा रद्द; भाजपची राज्य शासनावर टीका
  • ओळखपत्रांचा गोंधळ झाल्यामुळे रद्द केली परीक्षा
  • लेखी परीक्षा २५ आणि २६ सप्टेंबर रोजी राज्यातील १५०० केंद्रांवर एकाचवेळी होणार होती

मुंबईः आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांची लेखी परीक्षा रद्द केल्याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. ओळखपत्रांचा गोंधळ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन ओळखपत्र डाऊनलोड करुन घेताना अडचण येत होती तर अनेकांना इ-मेलवर चुकीचे ओळखपत्र आले. अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. maharashtra health department exam abruptly cancelled

लेखी परीक्षा २५ आणि २६ सप्टेंबर रोजी राज्यातील १५०० केंद्रांवर एकाचवेळी होणार होती. आऊटसोर्स केलेल्या यंत्रणेच्या मदतीने परीक्षा घेतली जाणार होती. पण ओळखपत्रांचा गोंधळ सोडवणे अशक्य आहे याची जाणीव झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. 

एनवायएसए कम्युनिकेशन प्रा. लि. या कंपनीला परीक्षेचे काम दिले आहे. या कंपनीचा इतिहास चांगला नसून अनेक परीक्षांमध्ये आधीही असाच गोंधळ घातला आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळ पाहता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाने परीक्षाच रद्द करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने आरोग्य मंत्र्यांना निवेदनाद्वारे केली होती. यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला.

राज्य शासनाच्या या कारभारावर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली. शासनाच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी नियोजन करण्याकरिता योग्य संस्थांची निवड केली जात नाही. यामुळे गोंधळ होतो आणि २४ तासांपेक्षा कमी कालावधी असताना परीक्षा रद्द झाल्याची घोषणा करावी लागते. हा भोंगळ कारभार आहे. जे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी प्रवास करुन केंद्राच्या ठिकाणी पोहोचले आहेत त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया गेले आहेत. या हानीसाठी शासन जबाबदार आहे; अशा शब्दात भाजपने महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

याआधी एमपीएससीची परीक्षा वारंवार रद्द झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून स्वप्नील लोणकर नावाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. अशा घटनेची पुनरावृत्ती व्हावी असे राज्य शासनाला वाटते का; असा प्रश्न महाराष्ट्र भाजपने उपस्थित केला आहे. भोंगळ कारभारात विद्यार्थ्यांचा बळी घेऊ नका, त्यांच्या भवितव्याशी खेळू नका; असे आवाहन महाराष्ट्र भाजपने केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी