Covid Updates Mask is back : महाराष्ट्रात पुन्हा दिसू लागणार मास्क, आरोग्यमंत्र्यांनी दिला सावधानतेचा सल्ला, सक्ती नाही पण काळजी घ्या !

मुंबई
अमोल जोशी
Updated Jun 04, 2022 | 16:17 IST

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे खबरदारीचा उपाय म्ङणून गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केलं आहे.

Covid Updates Mask is back
मास्क वापरण्याचं आवाहन  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा - आरोग्यमंत्री टोपे
  • महाराष्ट्रात पुन्हा वाढतायत कोरोनाचे रुग्ण
  • मास्कची सक्ती नाही, पण ते वापरण्याचं आवाहन

Covid Updates Mask is back : महाराष्ट्राच्या (Maharashtra) शहरी भागात (Urban area) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या (Corona Positive cases) संख्येत वाढ होऊ (Increase) लागली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रुग्णसंख्येत होणारी वाढ ही सध्या चिंताजनक नसली तरी वेळीच काळजी घेण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारनं नागरिकांना मास्क वापरण्याची सूचना केली आहे. मास्कमुक्त झाल्यामुळे मोकळा श्वास घेणारा महाराष्ट्र आता पुन्हा एकदा मास्कआड गेल्याचं चित्र त्यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. 

काय म्ङणाले आरोग्यमंत्री?

गेल्या काही दिवसांत दाटीवाटीची लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ नोंदवण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर यासारख्या दाटीवाटीच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याचा देशाच्या एकूण रुग्णसंख्येवरही परिणाम होत आहे. त्यामुळे शहरी भागात विशेषतः गर्दीच्या ठिकाणी नागरिरांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

नम्र आवाहन, सक्ती नाही

नागरिकांनी आत्मसंरक्षणासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावेत, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. शाळा, हॉस्पिटल, रेल्वे, कार्यालयं अशा बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असं टोपेंनी म्हटलं आहे. अर्थात, हे फक्त आवाहन असून नागरिकांवर मास्क वापरण्याची कुठलीही सक्ती करण्यात आलेली नाही, याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. सक्ती नसल्यामुळे मास्क न वापरल्याबद्दल दंड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 

कोरोना रुग्णसंख्येत वाढ

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. 3 रोजी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशभरात 4 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. याचाच अर्थ गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत 8.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापैकी सर्वाधिक रुग्णसंख्या केरळमध्ये असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा नंबर लागला आहे. 

महाराष्ट्रात चार आकडी रुग्णसंख्या

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी ही तीन अंकी नोंदवली जात होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून चार आकडी रुग्णसंख्येची नोंद व्हायला सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती गंभीर नसली तरी भविष्यातील धोका ओळखून आताच पावलं उचलायला सरकारनं सुरुवात केली आहे. 

पावसाळ्यात अधिक धोका

पावसाळा हा अनेक आजारही सोबत घेऊन येत असतो. डेंग्यु, मलेरियासोबत इतर अनेक साथीचे आजार पावसाळ्यात डोकं वर काढत असतात. त्यामुळे या काळात कोरोनाच्या रुग्णसंख्येतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सरकारनं पुन्हा एकदा चेहऱ्यावर मास्क चढवण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला महाराष्ट्रातील जनता कसा प्रतिसाद देेते, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी