तरच कदाचित 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन मागे घेतलं जाईलः राजेश टोपे

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 04, 2020 | 18:12 IST

राज्यातल्या लॉकडाऊनबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला.  

Rajesh tope
तरच कदाचित 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन मागे घेतलं जाईलः राजेश टोपे  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबईः राज्यातल्या लॉकडाऊनबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला.  मीच माझा रक्षक, मी घरात थांबणार आणि कोरोनाला हरवणार हा मंत्र प्रत्येकाने पाळला. स्वयंशिस्त राखली तर कदाचित 14 एप्रिलनंतर काही भागांमध्ये लॉकडाऊन शिथील होऊ शकतं असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी केलेल्या संवादामध्ये त्यांनी स्वतः 14 एप्रिलनंतर राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनच्या निर्बंधांवर पुनर्विचार सुरु असल्याचं सांगितलं. मात्र, 14 एप्रिलनंतर निर्बंध कमी करायची नाही हे सर्व नागरिकांच्या शिस्त पाळण्यावरच अवलंबून असणार आहे, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रात एकूण 537 पॉझिटिव्ह कोरोनाग्रस्त आहेत. मात्र 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या माध्यमातून आपण काळजी घेत आहोत. ट्रेसिंग करणं हे आता आव्हान आहे. सध्याच्या घडीला 9 लाख लोकांचं ट्रेसिंग केलं आहे. 2 हजार 455 टीम्स तयार केल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात त्या टीम करत आहेत. 290 विभाग मुंबई प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या विभागातही लोक काम करत आहेत. नागपूर, पुण्यातही काम करत आहेत. त्यांना सहकार्य करा असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील खासगी रुग्णालयांनी पूर्णपणे सेवा बंद करणे अयोग्यच आहे, असं राजेश टोपे म्हणाले. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत कंटेन्मेंट झोनच्या माध्यमातून आरोग्य सेवा देत आहोत. त्यांना तुम्ही सहकार्य कराल, मदत कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असंही ते म्हणाले.

सोशल डिस्टन्सिंग राखा, घरी थांबा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आज आपण लॉकडाऊन केला आहे. आपण 100 टक्के ते पाळतो देखील आहे. परंतू आपल्याला 14 एप्रिलनंतर काय असं वाटत आहे. आत्ताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिलनंतर टप्प्या-टप्प्याने यात काही ढिलाई देता येईल का याबाबतचा विचार सुरु असल्याची माहिती दिली. परंतू आपण शिस्त पाळली तरच हे सर्व करता येईल, असंही ते म्हणालेत. 

दररोज गरम पाणी घ्या, आवळा, लिंबू याचा जेवणात वापर करावा. योग्य पद्धतीने झोप घ्या. योग्य पद्धतीने व्यायाम करा. योगासनं किंवा इतर झेपतील असे व्यायाम करावेत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. आरोग्य विभाग योग्य पद्धतीने काम करतो असल्याचंही ते म्हणालेत. 

महाराष्ट्रात नवे 2 हजार व्हेटिलेटर्स उपलब्ध होत आहेत. 25 लाख ट्रिपल लेअर मास्कही उपलब्ध आहेत. वैद्यकीय साधनं योग्य प्रमाणात आहेत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. प्रत्येकाने N95 चा आग्रह धरणं योग्य नाही असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. आरोग्य विभागातील सगळ्या डॉक्टर, कर्मचारी, विविध विभागातले काम करणारे कर्मचारी जसे की पोलीस किंवा इतर सहकारी यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेचेही मी आभार मानतो असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही 250 डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. लवकरच तेही कोरोना नियंत्रणाच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडतील. सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी