मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज येथे दिल्या. (Maharashtra is leading the country in vaccinating 82 lakh citizens)
कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिवांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी सादरीकरण केले. महाराष्ट्रात सुमारे एक कोटी सहा लाख डोसेसे प्राप्त झाले असून त्यापैकी 88 लाख डोसेसचा वापर झाला आहे. महाराष्ट्रात डोस वाया जाण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या देखील निम्मे आहे. दि. 5 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात 81 लाख 21 हजार 332 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. राज्यात दररोज 4 लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे.
80 लाखांहून अधिक लोकांना लसीकरण करुन महाराष्ट्राने देशात अग्रक्रमात सातत्य राखल्याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन करतानांच लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी यावेळी केल्या. 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाची महाराष्ट्राची राज्य सरासरी 12.3 टक्के असून भंडारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी राज्य सरासरी पेक्षा अधिक लसीकरण केले आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून येथे प्राधान्याने 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. राज्यातील लसीकरणाचा वेग पाहता केंद्र शासनाकडून जास्तीचा पुरवठा होण्याकरीता पाठपुरावा करण्यात येईल असे मुख्य सचिवांनी सांगितले. (Maharashtra is leading the country in vaccinating 82 lakh citizens)
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.