Maharashtra-Karnataka border row: "कर्नाटकची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर..." राज ठाकरेंचा थेट इशारा

मुंबई
सुनिल देसले
Updated Dec 07, 2022 | 14:51 IST

Maharashtra - Karnataka border dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद आता आणखी चिघळल्याचं पहायला मिळत आहे. मंगळवारी (6 डिसेंबर) महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक पत्रक काढलं आहे. 

Maharashtra-Karnataka border dipute mns chief raj thackeray writes letter and appeal peace otherwise
Maharashtra-Karnataka border row: "कर्नाटकची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर..." राज ठाकरेंचा थेट इशारा 
थोडं पण कामाचं
  • सीमाप्रश्नावरुन राज ठाकरेंचं पत्र
  • महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावरुन मंगळवारी घडलेल्या प्रकारानंतर राज ठाकरेंचं पत्र
  • राज ठाकरेंनी पत्रातून कर्नाटकला दिला इशारा

Raj Thackeray letter: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सुरू असलेला सीमावाद आता आणखी चिघळताना दिसून येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याच्या संदर्भात केलेलं विधान आणि त्यानंतर मंगळवारी (6 डिसेंबर) बेळगावात महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांवर झालेली दगडफेक यासर्वांमुळे हा प्रश्न आणखी चिघळला आहे. त्याच दरम्यान आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून कर्नाटकला इशाराच दिला आहे. 

काय म्हटलंय राज ठाकरेंनी आपल्या पत्रात?

आपल्या पत्रात राज ठाकरेंनी म्हटलं, "मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा."

"हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं."

"अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधं सोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं."

"मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी