Maharashtra Monsoon Session : शिंदे सरकारचं आज पहिलं अधिवेशन, सत्ताधारी आणि विरोधक खडाजंगी होणार

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 17, 2022 | 07:37 IST

राज्यात शिवसेनेतून (Shiv Sena) बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार (Shinde and Fadnavis Govt) सत्तेत आले आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विरोधात बंड केल्यानंतरचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं (Chief Minister Eknath Shinde) हे पहिलंच पावसाळी अधिवेशन (Monsoon session) आहे..

Maharashtra Monsoon Session
शिंदे सरकारचं आज पहिलं अधिवेशन  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • विरोधक विविध मुद्द्यांवरुन शिंदे- फडणवीस सरकारची पळता भुई थोडी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
  • शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार.
  • अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे.

Maharashtra Monsoon Session : राज्यात शिवसेनेतून (Shiv Sena) बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार (Shinde and Fadnavis Govt) सत्तेत आले आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विरोधात बंड केल्यानंतरचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं (Chief Minister Eknath Shinde) हे पहिलंच पावसाळी अधिवेशन (Monsoon session) आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक नसताना अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिजोरीवर पडणारा बोजा, आमदारांना खूश करण्यासाठी होणारी निधीची खैरात, या पार्श्वभूमीवर सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. विरोधक विविध मुद्द्यांवरुन शिंदे- फडणवीस सरकारची पळता भुई थोडी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Read Also : Sidharth Malhotra 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

राज्याच्या विधीमंडळाचे बुधवारपासून अधिवेशन सुरू होणार असून त्या निमित्ताने शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याचं चित्र आहे. दरम्यान शिवसेनेचं मुखपत्र असेलल्या सामनामधून शिंदे सरकारवर आसुड उगारला आहे. एक बोचरी टीका करत शिवसेनेनं शिंदेंना डिवचलं आहे. 'एक कार्यकर्ता शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, सर्वोच्च मंत्रिपदापर्यंत पोहोचला तो शिवसेनेमुळे. त्याच कार्यकर्त्याने बेइमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण शेवटी ती गुलामीच आहे. गुलामांना कधीच प्रतिष्ठा मिळत नाही. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हे दिसेल,' असा इशारा देत शिवसेनेनं हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत दिले आहेत.

शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन, विविध मुद्द्यांवरून घमासान 

गेल्या अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळू शकते. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, मुंबईतील मेट्रो  कारशेडचा वाद, ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, यासह वादग्रस्त मुद्द्यांवरून घमासान पाहायला मिळणार आहे. अधिवेशनात सत्तेत असलेली महाविकास आघाडी आता विरोधी बाकावर दिसणार आहे. मंत्र्यांनी नुकताच शपथ घेतली आणि नुकतेच खातं वाटप झालेलं आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार असल्याचं चित्र दिसत आहे.

Read Also  : लक्ष्मी माताला प्रसन्न करायची असेल तर करा हे उपाय

कोणत्या मुद्द्यांवरुन सरकारची होणार कोंडी

1) मुसळधार पावसानं केलेलं शेतीचं नुकसान 
2) पूरपरिस्थिती 
3) रखडलेले प्रकल्प 
4) वादग्रस्त आमदार आणि मंत्री 
5) राज्यावरचं कर्ज 
6) मागच्या सरकारच्या कामांची चौकशी
7) राज्यपाल नियुक्त 12 नावांवरून गदारोळ. 

17 ते 25 ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचा कालावधी

येत्या 17 ऑगस्टपासून ते 25 ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. या कालावधीत शुक्रवारी, 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुट्टी आहे. दिनांक 20 आणि 21 ऑगस्ट या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या आहेत. 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला शोक प्रस्ताव, नवीन मंत्र्याची ओळख आणि शेवटी अंतिम आठवडा प्रस्ताव आणि त्यामध्ये रंगेल ते सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये घमासान होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचं पहिलं पावसाळी अधिवेशन असल्यानं शिंदेसमोर प्रश्न अनेक पण वेळ कमी असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांवर सत्ताधाऱ्यांची मदार असणार आहे .

Read Also : आमिर खानने घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर झाली चर्चा

सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन

राज्यात 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 ते 11.1 या वेळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन घेण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्वाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व नागरिकांना या राष्ट्रगीत गायन उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमात सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन एक विक्रम प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या स्वराज्य महोत्सवाचे आयोजन सुरू असून या महोत्वा अंतर्गत 'सामूहिक राष्ट्रगीत गायन' ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी