मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड शमविण्यासाठी शिवसेने (Shiv Sena) कडून प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही शिंदे गटाला मुंबईत येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं. मात्र, शिंदे गट आपल्या मागणीवर ठाम आहे. त्यामुळे शिवसेनेकडून १२ आमदारांना बडतर्फ करण्यासाठी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांना एक पत्र देण्यात आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करत प्रत्युत्तर दिलं. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज दिलं आहे.
खूप चुकीचं पाऊल उचललं
शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं, आम्ही हार मानणार नाहीत. आम्ही जिंकणार, बहुमत सिद्ध करणार. लढाई रस्त्यावर झाली तर तिथेही आम्ही जिंकू. ज्यांना आमचा सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत येऊ शकतात. खूप चुकीचं पाऊल यांनी उचललं आहे. आम्ही त्यांना परत येण्याची संधी दिली. पण आता मला वाटतं वेळ निघून गेली आहे.
आत्ताच आमची बैठक झाली. शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अनिल देसाई सुद्धा होते. मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा झाली. आमची पूर्ण तयारी आहे. आता आमचं चॅलेंज आहे तुम्ही इथे या. या इमारतीतून महाविकास आघाडीची घोषणा झाली आणि याच इमारतीतून मी सांगतो मविआ सरकार पुढील अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल. आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रच
संजय राऊत यांनी म्हटलं, ही आता कायदेशीर लढाई आहे. पाहुया सर्वोच्च न्यायालयाचे निकाल काय म्हणतात? काहीजण म्हणतात शिंदे गटाकडे आकडे 40 आहेत, काहीजण म्हणतात 140 आहेत. त्यांनी एक निर्णय घेतलाय. पण महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत, ठिक आहे... शिवसेनेचा आकडा कमी झालाय, पण ते आमदार जेव्हा शिवसेनेत येतील तेव्हा त्यांच्या निष्ठेची खरी कसोटी लागेल.
आता काही लोक शरद पवारांना घरी जाऊ देणार नाही अशी धमकी देतायत. ही आपली संस्कृती आहे का?, मोदी, शाहंनी ऐकावं तुमचे खासदार काय बोलतायत. त्यांना कोणत्या महाशक्तित विलीन व्हायचंय ते होऊ द्या, पण शिवसेना एक महासागर आहे असंही संजय राऊत म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.