"बंडखोरांना इथे यावंच लागेल, विधानसभेच्या प्रांगणात आल्यावर...."

मुंबई
सुनिल देसले
Updated Jun 23, 2022 | 20:39 IST

Sharad Pawar Press Conference on Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांची, आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. 

Sharad Pawar
"बंडखोरांना इथे यावंच लागेल, विधानसभेच्या प्रांगणात आल्यावर...."  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • कोरोना सारखं राष्ट्रीय संकट असताना महाविकास आघाडी सरकराने उत्तम काम केलं. महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग फसला हे बोलणं म्हणजे राजकीय अज्ञान : शरद पवार
  • इथे कुणी दिसत नाही याचा अंदाज काढू नये, गुवाहाटीला मदतीला कोण आहे हे पहावं लागेल. गुवाहाटीत असलेल्या त्या आमदारांना इथे यावचं लागणार आहे.
  • निधी वाटपाबाबत केलेल्या आरोपावर शरद पवार यांनी म्हटलं, या आरोपांत काहीही तथ्य नाहीये. 

मुंबई : शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) अडचणीत आलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदारांच्या संख्येत वाढ झाल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येतं की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बंडखोर आमदारांना पुन्हा शिवसेनेत बोलवण्यासाठी शिवसेनेकडून (Shiv Sena) प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून या प्रयत्नांना यश आलेले नाहीये. त्याच दरम्यान आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे गटाला मुंबईत येण्याचं आवाहन करत मविआ सोडण्याबाबत भाष्य केलं आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे.

शरद पवार म्हणाले, कोरोना सारखं राष्ट्रीय संकट असताना महाविकास आघाडी सरकराने उत्तम काम केलं. अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. हे सर्व पाहताना सुद्दा महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग फसला हे बोलणं म्हणजे राजकीय अज्ञान आहे. 

विधानसभेत बहुमत सिद्ध होणार

विधानसभेचे सदस्य महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर ज्या प्रकारे त्यांना नेण्यात आलं त्याची वस्तूस्थिती सांगतील याची मला खात्री आहे. तसेच ते आमदार इथे आल्यावर शिवसेनेसोबत असतील. बंडखोर आमदार महाराष्ट्रात परत आल्यावर बहुमत आहे की नाही हे विधानसभेत सिद्ध होईल असंही शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले, जे लोक बाहेर गेले त्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पक्षांसोबत आमची नाराजी आहे. त्यावर संजय राऊत यांनी म्हटलं, हे सर्व इथे येऊन बोला आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडू पण आसाममध्ये बसून बोलू नका इथे येऊन बोला.

अजितदादांना गुजरात, आसाममधील स्थिती माहिती नसावी

एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी तिथे आहेत. अजित पवारांना इथली स्थानिक परिस्थिती जरूर माहिती आहे. अजित पवारांनी महाराष्ट्रातील, मुंबईतील स्थिती पाहून विधान केलं असावं. पण गुजरात, आसाममधील स्थिती अजितदादांना माहिती नसेल. गुजरात आणि आसाम इथली परिस्थिती आम्हाला अधिक माहिती आहे असंही शरद पवार म्हणाले.

एकनाथ शिंदेंना कुणाचा पाठिंबा?

आता मी टीव्हीवर एकनाथ शिंदे यांचा एक इंटरव्हूयू पाहिला त्यात त्यांनी म्हटलं, आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. माझ्याकडे देशातील राष्ट्रीय पक्षांचा पाठिंबा आहे. या राजकीय पक्षांत भाजप, बसपा, काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी एकूण सहा एकूण अधिकृत पक्ष आहेत. या यादीतील कुठल्या राजकीय पक्ष त्यांना मदत करतोय हे सांगण्याची गरज नाही असंही शरद पवार म्हणाले.

इथे कुणी दिसत नाही याचा अंदाज काढू नये, गुवाहाटीला मदतीला कोण आहे हे पहावं लागेल. गुवाहाटीत असलेल्या त्या आमदारांना इथे यावचं लागणार आहे. विधानसभेच्या प्रांगणात आल्यावर भाजपचे नेते त्यांना मार्गदर्शन करतील असं मला वाटत नाही असंही शरद पवार म्हणाले आहेत. निधी वाटपाबाबत केलेल्या आरोपावर शरद पवार यांनी म्हटलं, या आरोपांत काहीही तथ्य नाहीये. 

ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीमुळे अनेक आमदारांनी बंड केलं का ? यावर शरद पवार म्हणाले, एकदम निष्कर्ष काढणे योग्य नाही. पण काही जणांची विविध एजन्सीकडून चौकशी सुरू आहे किंवा होती. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला नसेल असं म्हणता येणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी