मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) अडचणीत आले आहे. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेनेच्या आमदारांच्या पाठिंबा वाढत असल्याने शिवसेना नेमकी कुणाची हा प्रश्न उपस्थित होऊ लागला. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांना पुढील २४ तासांत मुंबईत येण्याचं आवाहन केलं. मात्र, शिंदे गटाकडून ही ऑफर धुडकावण्यात आली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पुन्हा एक पाऊल पुढे टाकत एकनाथ शिंदे यांना एक आवाहन केलं आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "चर्चेतून मार्ग निघू शकतो.... चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत... का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!"
चर्चेतून मार्ग निघू शकतो. — Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2022
चर्चा होऊ शकते.
घरचे दरवाजे उघडे आहेत..
का उगाच वण वण भटकताय?
गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ!
जय महाराष्ट्र!
संजय राऊत यांनी केलेल्या या आवाहनानंतर आता एकनाथ शिंदे हे काय भूमिका घेतात हे पहावं लागेल. एकनाथ शिंदे चर्चेची तयारी दर्शवतात की आणखी काही निर्णय घेतात याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संजय राऊतांची शिंदेंना ऑफर
दरम्यान दुपारी शिवसेना आमदारांसोबत बैठक झाल्यावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना थेट ऑफरच देत मविआमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. संजय राऊत म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायला तयार आहोत. २४ तासांत मुंबईत या आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर सांगावं की महाविकास आघाडीत आम्हाला राहण्याची इच्छा नाही.
२१ आमदार आमच्या संपर्कात
संजय राऊत यांनी पुढे म्हटलं, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांपैकी दोन आमदार पुन्हा परतले आहेत. आता त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांपैकी २१ आमदार हे आमच्या संपर्कात आहेत. कुणी कितीही फोटो, व्हिडिओ पाठवायचे आहेत ते पाठवावे. हे सर्व आमदार मुंबईत आल्यावर शिवसेनेचे असतील.
तर तिकडे गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या आमदारांसोबतचा एक व्हिडिओ एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे शक्तिप्रदर्शन करताना दिसून येत आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.