शिंदेंच्या गोटात गेलेल्या नव्या आमदारांबाबत जयंत पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई
सुनिल देसले
Updated Jun 23, 2022 | 13:03 IST

Jayant Patil big statement over Shiv Sena mla rebel: एकनाथ शिंदे यांच्या गटात समावेश होणाऱ्या आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ झाली असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे.

Jayant Patil big statement over Maharashtra Political crisis
शिंदेंच्या गोटात गेलेल्या नव्या आमदारांबाबत जयंत पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • बंडखोर एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांच्या संख्येत आणखी वाढ
  • एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या ४५ वर
  • शिवसेनेच्या आमदारांच्या बंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केली शंका

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्व आमदारांना भावनिक आवाहन केलं. उद्धव ठाकरेंच्या भावनिक आवाहनानंतर बंड केलेले आमदार हे पुन्हा स्वगृही परततील असं म्हटलं जात होतं. मात्र, आज तब्बल आठ आमदार शिंदे गटात सहभागी झाल्याने शिंदेंच्या गटातील आमदारांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. शिंदे गटाची संख्या वाढत असताना मुंबईत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांच्याही बैठकांचं सत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडल्यावर जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे.

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख नेत्यांची बैठक झाली. सध्याच्या राजकीय परिस्थीवर विचार-विनिमय झाला. उद्धव ठाकरेंच्या नेत्रृत्वात मविआ सरकार टिकावं आणि सर्वांनी एकमुखाने उद्धव ठाकरेंच्यासोबत रहावं. राज्यातील महाविकास आघाडीचं हे सरकार टिकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत आणि आम्ही त्यांना आवश्यक मदत करावी ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. येणाऱ्या काळात, पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले शिवसेनेचे विधानसभेचे आमदार हे परत येतील. त्यावेळी ते पुन्हा आपल्या स्वत:च्या पक्षात कार्यरत राहतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे हे आमदार परत आल्यावर चित्र अधिक स्पष्ट होईल.

उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचं नेत्रृत्व करत आहेत. त्यांना पूर्णपणे मविआचं नेत्रृत्व करण्यासाठी आमचा यापूर्वीही पाठिंबा होता आणि यानंतरही असेल असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या आमदारांना पाठवण्यात आलं?

शिवसेनेच्या आमदारांना जाणून-बुजून पाठवण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे? यावर जयंत पाटील म्हणाले, यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही कारण शिवसेनेच्या अंतर्गत काय सुरू आहे याची मला माहिती नाही. शरद पवार यांच्या उपस्थितीत काल आम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना या संकटात आवश्यक असेल ती मदत करण्याची भूमिका व्यक्त केली. तसेच हे सरकार टिकण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न याबाबतही चर्चा झाली. हे सरकार टिकवण्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत.

मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर हे मुंबईतील आमदार आहेत आणि हे मुंबईतील आमदार जाणार नाहीत असा आमचा विश्वास होता. पण आज ते गेले आहेत याचा आम्हालाही आश्चर्य वाटत आहे. उद्धवजींनी जे आवाहन केलं आहे त्यानुसार, हे गेलेले सर्व आमदार पुन्हा परततील. कदाचीत हे आमदार गेले आहेत ते तेथील परिस्थिती पाहण्यासाठी किंवा कदाचीत त्या आमदारांना परत गेले असतील असंही जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील पुढे म्हणाले, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कामाच्या सोयीसाठी आणि आमच्या सर्वांच्या आग्रहास्तव मातोश्रीहून वर्षा बंगल्यावर आले होते. आता त्यांनी पक्षातील परिस्थितीनुसार वर्षाहून मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण मुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. गेलेले आमदार पुन्हा येतील असा आम्हाला विश्वास आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी