लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाला प्रवासासाठी पास देणं महागात, विशेष प्रधान सचिवांवर सरकारची कारवाई

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 10, 2020 | 10:14 IST

खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणं, विशेष प्रधान सचिवांना भोवलं. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत गृह विभाग विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेत.

Anil Deshmukh
लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाला प्रवासासाठी पास देणं महागात, विशेष प्रधान सचिवांवर सरकारची कारवाई  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • कपील आणि धीरज वाधवान बंधू यांच्यासह कुटुंबियांना लॉकडाऊनदरम्यान प्रवासाचे व्हीआयपी पास देणं चांगलच भोवलं आहे.
  • गृह विभाग विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजता या संदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली.

मुंबईः  DHFL चे प्रमोटर्स आणि YES BANK घोटाळ्यात आरोप असलेले कपील आणि धीरज वाधवान बंधू यांच्यासह कुटुंबियांना लॉकडाऊनदरम्यान प्रवासाचे व्हीआयपी पास देणं चांगलच भोवलं आहे. खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणं, विशेष प्रधान सचिवांना भोवलं. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत गृह विभाग विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्रालय आणि सरकारकडून याची तातडीनं चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख्य यांनी दिलं आहे.

वाधवान कुटुंबातील 23 जणांना प्रवासाची सवलत देणारे पत्र जारी केल्याने प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. अमिताभ गुप्ता यांनी अधिकारांचा गैरवापर करत वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत केल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी रात्री उशिरा चर्चा करुन गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजता या संदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना फोन करुन वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. 

DHFL चे प्रमोटर्स आणि YES BANK घोटाळ्यात आरोप असलेले कपील आणि धीरज वाधवान बंधू यांनी लॉकडाऊनची उल्लंघन केल्याचं उघड झालं आहे.
वाधवान कुटुंब मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिल परिसरातं राहतं. मुंबईहून हे कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचलं असता, स्थानिकांनी 23 जणांना पाहून याचा विरोध केला आणि लॉकडाऊनदरम्यान हे लोक महाबळेश्वरला कसे पोहोचले. काही रहिवाशांनी याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

महाबळेश्वरमध्ये पोहोचलेल्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या वाधवान कुटुंबातील सर्व सदस्यांना विलग करण्यात आलं आहे. महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्यांमध्ये कुटुंबातील महिला आणि मुलांचाही समावेश आहे. 144 कलमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. हे वाधवान बंधू आपल्या 5 अलिशान कारमधून 23 कुटुंबीयांना घेऊन मुंबईहून महाबळेश्वरला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असतानाही गेले होते. या प्रवासासाठी त्यांनी थेट गृहमंत्रालयातून पत्र मिळालं होतं.

या प्रकरणाविरोधात विरोधी पक्षातील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला होता. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधूंचा अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी संबंध आणि येस बँकेकडून घेतलेले कर्ज थकित झाल्याप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्डरिंग कायद्या अंतर्गत तपास सुरु आहे. मिर्ची प्रकरणात त्यांना फेब्रुवारी महिन्यात जामीन मिळाला. तर येस बँक प्रकरणी तपास अद्याप सुरु आहे. पास सुरु असतानाच वाधवान बंधूंनी मुंबईबाहेर पळ काढल्याने आणि त्यातही संचारबंदीच्या काळात प्रवास केल्याबद्दल ईडीने त्यांना परत आणण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी