Varsha Gaikwad । मुंबई : राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण तज्ज्ञ असो, समाज माध्यम आणि पालक यांच्याकडून मागणी होत आहे. याचा विचार करून आम्ही अनेकांशी चर्चा केली. त्यानंतर असा निर्णय घेतला की ज्या ठिकाणी रुग्ण संख्या कमी आहे, अशा शहरातील स्थानिक प्रशासनाने आढावा घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्यात याव्यात, या संदर्भात एक प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्याकडे प्रस्ताव दिल्याची माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शाळा सुरू करण्याचे अधिकार सीईओ, आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावे, असे प्रस्तावात नमूद केले आहे. तसेच यात काही एसओपीसुद्धा नमूद करण्यात त्यात प्रामुख्याने १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण हे शालेय स्तरावर करण्यात यावे. तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचेही लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शालेय शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्र्यांना दिलेल्या प्रस्तावात येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याची विचारणा करण्यात आली आहे. तसेच कोणती शाळा सुरू करावी यासंदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनाने घेण्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे २ लाख ६७ हजार ६५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. यामुळे राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल आणि परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
राज्यातील शाळा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. मात्र शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याच्या धोरणाचा गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. ज्या घरात एकपेक्षा जास्त मुले आहेत अशा ठिकाणी ऑनलाइन शिक्षणासाठी दोन मोबाइल घेणे सर्वांनाच परवडणारे नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित मिळत नाही. यामुळे जिथे कोरोना नियंत्रणात आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.