मुंबई : राज्यात इयत्ता दहावी (SSC exam) व बारावीची परीक्षा (HSC exam) ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: १६ लाख तर बारावीसाठी १५ लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणीक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या "राज्यातील डोंगराळ भागात ऑनलाईन शिक्षण शक्य नसल्याने मुलं ऑफलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. १०वी, १२वीची परीक्षा ही बोर्डाची असते त्यातूनच आपण मेरिट लिस्ट तयार करतो. त्यावरच आधारित अॅडमिशन असतात. त्यामुळे परीक्षा ऑफलाईनच घ्याव्या लागतील."
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १५ मार्चपासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य मंडळांच्या परीक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केल्याचेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.