SSC Results 2022 : थोडी धाकधूक, थोडं टेन्शन! दहावीच्या निकालाला उरले काही तास, असा पाहा निकाल

मुंबई
अमोल जोशी
Updated Jun 14, 2022 | 08:22 IST

दहावीचा निकाल म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन येतंच. त्यात यंदा ऑनलाईन अभ्यास करून विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली आहे. त्यामुळे टेन्शनची पातळी थोडी जास्त आहे.

SSC Results 2022
दहावीच्या निकालाला उरले काही तास  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • दहावीचा निकाल येत्या एक दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता
  • 15 जूनला जाहीर होऊ शकतो निकाल - शिक्षणमंत्री
  • विद्यार्थ्यांच्या मनात थोडी धाकधूक, थोडं टेन्शन

SSC Results 2022 : दहावीचा निकाल याच आठवड्यात जाहीर होणार, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फक्त उत्सुकता नव्हे, तर टेन्शनसुद्धा. कारणही तसंच आहे. गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाय ऑनलाईन. यंदा ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली, ते आठवीत असतानाच कोरोनाची भारतात एन्ट्री झाली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शाळा पाहिली होती, ती फक्त सातवीपर्यंतच. सातवीची परीक्षा तरी त्यांना कुठे नीटपणे देता आली? परीक्षा सुरू होण्यापूर्वीच कोरोना येऊन धडकला आणि शाळा बंद झाल्या. बंद झाल्या ते झाल्याच. 

दोन वर्षं ऑनलाईन शिक्षण

सुरुवातीला विद्यार्थ्यांना वाटलं की शाळा दोन आठवड्यांत सुरु होतील. पण कसंच काय? दोन आठवड्यांचे दोन महिने झाले. मग दोन महिन्यांची दोन वर्षं झाली. कोरोनाची पहिली लाट, मग काहीशी अपेक्षा, मग पुन्हा दुसरी लाट असं करत करत दोन वर्षं कधी गेली, हे विद्यार्थ्यांना समजलंदेखील नाही. रोज मोबाईलवरून ऑनलाईन शाळेसाठी जॉईन व्हायचं आणि घरीच बसून अभ्यास करायचा असा सिलसिला सुरू होता. अखेर दहावीच्या शेवटच्या टर्ममध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाला आणि सरकारनं परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना टेन्शन आलं होतं. ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेत काय चमत्कार करू शकतील, अशी चर्चा सगळीकडे रंगली होती. विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईनच घ्या, अशी मागणी करण्यासाठी काही आंदोलनंही झाली. पण सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिलं आणि ऑफलाईन परीक्षाही पार पडल्या. 

अधिक वाचा - Summer Vacation: मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या कारणास्तव वाढवली उन्हाळ्याची सुट्टी

लवकरच निकाल

आता या परीक्षेच्या निकालाची तारीख जवळ येत चाललीय. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटल्यानुसार 15 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल अगोदरच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी त्यात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. आता आपलं काय होईल, या टेन्शननं विद्यार्थ्यांना ग्रासलं आहे. 

असा पाहा निकाल

निकालाची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. पुढच्या काही तासांत दहावीचा निकाल जाहीर झालेला असेल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका ऑनलाईन मिळालेल्या असणार आहेत. www.maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. वेबसाईट ओपन झाल्यावर विद्यार्थ्यांनी SSC हा पर्याय निवडावा. त्यानंतर रोल नंबर आणि आईचे नाव हे पर्याय विचारले जातात. ते भरल्यानंतर विद्यार्थ्याला त्याचा निकाल पाहता येणार आहे.

अधिक वाचा - Do Aliens Really exist? : खरंच एलियन्स असतात का? नासाच्या प्रमुखांनी दिलं एका शब्दात उत्तर

करिअरचा महत्त्वाचा टप्पा

दहावीनंतर करिअर एक मोठं वळण घेत असतं. आयुष्यात पुढे काय करायचं, याचा निर्णय दहावीनंतरच होत असतो. कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा, या निर्णयावर भविष्यातील अनेक गोष्टी अवलंबून असतात. आपण काय करावं, याचा ठोस निर्णय विद्यार्थी घेऊ शकत नसेल, तर ॲप्टिट्यूड टेस्ट करण्याचा सल्ला शिक्षणतज्ज्ञांकडून दिला जातो. मुलांचा कल ओळखून त्यांना करिअरची योग्य दिशा मिळाली, तर भविष्यात मूल यशस्वी होऊ शकतं, हे दिसून आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी