लोकसभा निकालानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल?

मुंबई
Updated May 15, 2019 | 20:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

लोकसभा निकालासाठी अवघे आठ दिवस शिल्लक असताना आता राज्यातील भाजप सरकारने विधानसभेच्या तयारीला सुरूवात केली आहे. निकालानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस  

मुंबई :  लोकसभेच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसत नाही तोपर्यंतच राज्यातील राजकारणाला म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला राज्य सरकार लागल्याची चर्चा सध्या मंत्रालय परिसरात आहे. लोकसभेचा निकाल भाजप-सेना युतीच्या बाजूने लागला तर राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान जे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये सामील झाले, त्यांचे पुनर्वसन करून त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात चांगली खाती दिली जाऊ शकतात. त्यामुळे आता कोणाची वर्णी मंत्रिमंडळात लागते आणि कोणाला डच्चू मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.  लोकसभेतील निकाल भाजप-सेना युतीच्या बाजूने लागले तर काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते  राधाकृष्ण विखे पाटील, विजय सिंह मोहिते पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मोठी खाती मिळण्याची शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दोन बंड पुकारण्यात आले. त्यात नगर जिल्ह्यातून काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूक्ष सुजय विखे पाटील आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपूत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. त्यानंतर त्यांचे वडिलांनी मुलांना पाठिंबा दिला. 

नगरच्या जागेवर सुजय विखे पाटील यांना यश मिळाले तर राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये दाखल होऊन त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद दिले जाऊ शकते. त्यांनी यासाठी आग्रह धरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पण भाजप त्यांना रिक्त असलेले कृषीमंत्रीपद देऊ शकते अशी शक्यता आहे. 
 तसेच विजयसिंह मोहिते पाटील हे देखील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करतील, तसेच त्यांनाही चांगले महत्त्वाचे खाते मिळू शकेल. 

तर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर असून त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांना गिरीश बापट यांच्याकडे असलेली खाती मिळू शकतात. गिरीश बापट यांनी पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. त्यांच्याकडे सध्या अन्न व नागरी पुरवठा तसेच संसदीय कामकाज मंत्रालयाचा कारभार आहे. ही खाती क्षीरसागर यांना दिली जाऊ शकतात. 

त्यामुळे भाजपने आता विधानसभेची तयारी सुरू केली असून त्यांना राज्यात यश मिळविण्यासाठी मंत्रिमंडळात हे बदल करणे गरजे असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी