मराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार

Maratha Kranti Morcha Agitation for Maratha Reservation फडणवीस सरकारच्या काळात मिळालेले मराठा आरक्षण ठाकरे सरकारच्या काळात स्थगित झाल्यामुळे आरक्षण समर्थक मराठा समाजाच्या नागरिकांनी आंदोलनाची तयारी केली आहे.

Maratha Kranti Morcha Agitation for Maratha Reservation
मराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार 

थोडं पण कामाचं

  • मराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार
  • १७ सप्टेंबरपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन नव्याने सुरू
  • आंदोलन झाल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती

मुंबईः फडणवीस सरकारच्या काळात मिळालेले मराठा आरक्षण ठाकरे सरकारच्या काळात स्थगित झाले. सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती दिली. महाराष्ट्र सरकार युक्तीवाद करण्यात कमी पडल्यामुळेच ही स्थगिती मिळाली आहे, असा संशय व्यक्त करत आरक्षण समर्थक मराठा समाजाच्या नागरिकांनी आंदोलनाची तयारी केली आहे. (Maratha Kranti Morcha Agitation for Maratha Reservation)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाचे कारण पुढे करुन मराठा समाजाला आंदोलन करू नका असे आवाहन केले होते. मात्र आंदोलनाच्या मुद्यावर मराठा समाज ठाम आहे. मराठा क्रांती मोर्चा या संघटनेने १७ सप्टेंबरपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन नव्याने सुरू होत असल्याचे जाहीर केले. पुण्यात १७ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहे. 

मुंबईत २० सप्टेंबर रोजी ठिकठिकाणी ठिय्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. तसेच २१ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. सोलापूरमध्येही ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे. 

मराठा क्रांची मोर्चाचे समन्वयक २३ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे एक परिषद घेणार आहेत. या परिषदेत आंदोलनाची पुढील रुपरेखा निश्चित केली जाईल. परिषदेच्या निमित्ताने मराठा समाजातील अनेक तज्ज्ञ मंडळी एकत्र येतील. चर्चेतून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल. 

मराठा आरक्षण प्रकरणी आधी काय घडले?

फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. या आरक्षणामुळे राज्यातील एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्यामुळे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे न्यायालयात सादर झाली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले. 

महाराष्ट्रात सत्तांतर झाले ठाकरे सरकारच्या कार्यकाळात युक्तीवाद झाला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. सरकारने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य केली. मोठ्या खंडपीठाची रचना सरन्यायाधीश करतील. ही सुनावणी अद्याप झालेली नाही. मात्र एका सरकारने दिलेले आरक्षण दुसऱ्या सरकारला राखणे जमले नाही, अशी भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे. याच कारणामुळे मराठा समाजाने पुन्हा आंदोलन सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनीही मराठा आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

देशातल्या २६ राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशांमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडण्यात आली आहे. असे असूनही सर्वोच्च न्यायालयाने फक्त महाराष्ट्रात असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणावर स्थगिती आणली आहे. ही दुर्दैवाची बाब असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे म्हणणे आहे. स्थगितीवर पुनर्विचार व्हावा यासाठी सध्याच्या राज्य सरकारने प्रयत्न केले नाही, असा आरोप मराठा समाजाकडून होत आहे. 

मोठ्या खंडपीठाचा निर्णय येईल पण आधीपासून सुरू असलेले आरक्षण स्थगित झाल्यामुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे. समाजाची फसवणूक झाली आहे, असा गंभीर आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन नव्याने सुरू करण्याची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे २०२०-२१ या वर्षात सरकारी नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेशात कुठेही मराठा आरक्षण लागू होणार नाही. कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या मराठा समाजासाठी आरक्षण स्थगित होणे हा सर्वात मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया आंदोलनाची तयारी करत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी दिली. 

आंदोलन झाल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती

महाराष्ट्रात २ लाख ९१ हजार ७९७ कोरोना रुग्णांवर (कोरोना अॅक्टिव्ह पेशंट) उपचार सुरू आहेत. राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात २० हजार ४८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना संकटाची तीव्रता वाढत आहे. अशा परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती राज्य सरकार व्यक्त करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी