ठाकरेंच्या घरात भूकंप, काकांना सोडून पुतणे शिंदेंच्या तंबूत!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 29, 2022 | 20:19 IST

काका उद्धव ठाकरे यांना सोडून त्यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. निहार ठाकरे यांनी शिंदेंना समर्थन देऊन राजकारणात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Massive blow to Uddhav Thackeray camp, nephew Nihar Thackeray pledges support to Eknath shinde
ठाकरेंच्या घरात भूकंप, काकांना सोडून पुतणे शिंदेंच्या तंबूत!  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ठाकरेंच्या घरात भूकंप, काकांना सोडून पुतणे शिंदेंच्या तंबूत!
  • कनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटलो : निहार ठाकरे
  • बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे नातू अॅडव्होकेट निहार बिंदूमाधव ठाकरे

मुंबई:  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचंड कोंडी करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण पक्षीय पातळीवर उद्धव ठाकरेंना हादरा दिल्यानंतर आता कौटुंबिक पातळीवर देखील उद्धव ठाकरेंना नामोहरम करण्याची एकही संधी शिंदे सोडत नसल्याचं दिसून येत आहे. कारण काका उद्धव ठाकरे यांना सोडून त्यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. निहार ठाकरे यांनी शिंदेंना समर्थन देऊन राजकारणात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन काम करणाऱ्या नेत्यांचीच शिवसेना आहे. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटलो असे अॅडव्होकेट निहार बिंदूमाधव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत तर निहार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत थोरले पुत्र बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. बिंदूमाधव यांचा जन्म १९५२ मध्ये जयदेव यांचा जन्म १९५५ मध्ये आणि उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला.

बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे नातू निहार ठाकरे मुंबईत वकिलीचा व्यवसाय करतात. निहार यांची पत्नी अंकिता ही भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या आहे. यामुळे निहार यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देत राजकारणात प्रवेश केला तर उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या मोठा धक्का बसेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 

बिंदूमाधव यांनी प्रिटिंग टेक्नॉलॉजी या विषयात उच्च शिक्षण घेतले होते. नंतर त्यांनी चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. ताडदेवमध्ये ड्रम्स बीट रेस्टॉरंट आणि कांदिवलीत एक हॉटेल सुरू केले होते. बिंदाटोन नावाच्या म्युझिक कंपनी सुरू करून गाण्यांच्या आणि म्युझिकच्या कॅसेट काढल्या होत्या. समुद्र व्हिडीओ निर्मिती कंपनी सुरू केली होती. नदीम श्रवण यांचा एक म्युझिक आल्बम काढला होता. तसेच मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांना घेऊन अग्निसाक्षी या सिनेमाची निर्मिती केली होती. 

ठाकरे कुटुंब एकत्र राहात होते पण बिंदूमाधव वेगळ्या घरात राहून संसार करत होते. लोणावळ्याजवळ २० एप्रिल १९९६ रोजी एका अपघातात बिंदूमाधव यांचे निधन झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर काही महिन्यातच बिंदूमाधव गेले. यानंतर बिंदूमाधव यांचे कुटुंब मातोश्री बंगल्यापासून अंतर राखून होते. पण दिवंगत बिंदूमाधव यांच्या कुटुंबाभोवतीचे ठाकरे नावाचे वलय आजही कायम आहे. अॅडव्होकेट निहार बिंदूमाधव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी