'मातोश्री'वरील आमदारांची बैठक संपली, पाहा उद्धव ठाकरेंनी काय घेतला निर्णय

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 07, 2019 | 14:24 IST

Shivsena MLA Meeting: शिवसेनेने आपल्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक 'मातोश्री'वर बोलावली होती. या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली मतं देखील मांडली आहेत.

meeting of mlas on matoshree is over, see what uddhav thackeray decided
'मातोश्री'वरील आमदारांची बैठक संपली, पाहा उद्धव ठाकरेंनी काय घेतला निर्णय   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • शिवसेना आमदारांची मातोश्रीवरील बैठक संपली
  • शिवसेनेच्या सर्व आमदारांना एकत्र राहण्याचे आदेश
  • शिवसेनेचे आमदार रंगशारदामध्ये राहणार, पुढील काही दिवस महत्त्वाचे

मुंबई: शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची आज (गुरुवार) काही वेळापूर्वीच 'मातोश्री'वर बैठक पार पडली. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना काय आदेश दिले याबाबत सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराला मुंबई सोडून न जाण्याचे आदेश पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, या बैठकीतून एक अशी माहिती समोर येत आहे की, शिवसेना आपल्या मागणीवर अद्यापही ठाम आहे. 

शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत नेमका काय निर्णय झाला याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र, शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत अनेक आमदारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र, सर्वच आमदारांकडून असंच सांगण्यात आलं की, याबाबतची नेमकी भूमिका ही उद्धव ठाकरेच स्पष्ट करतील. कारण उद्धव ठाकरे यांना सर्व आमदारांनी निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. मात्र, शिवेसना अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आता भाजपसमोरील पेच आणखी वाढणार आहे. 

दुसरीकडे शिवसेना या बैठकीनंतर लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन आमदारांच्या बैठकीत नेमकं काय ठरलं हे स्पष्ट करतील. शिवसेनेने भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी भाजपच्या नेत्यांकडून बरेच प्रयत्न सुरु होते. मात्र शिवसेना समसमान वाटप या मागणीवर ठाम असल्याने आता राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा खूपच वाढला आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या सर्व आमदारांना पुढील काही दिवस एकत्र राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आमदार फुटू नये यासाठी शिवसेनेने आपले सर्व आमदारांना आता रंगशारदावर ठेवले आहेत. पुढील काही दिवस हे भाजप आणि शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. अशा वेळी या दोन्ही पक्षांकडून डाव-प्रतिडाव टाकले जात आहेत. यामुळे आता या सत्तेच्या रस्सीखेचमध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी