Mhada Lottery 2023 registration Process, मुंबई : मुंबई, पुणे आणि मोठ्या महानगरांमध्ये आपल्या स्वप्नांचे घर घेणाऱ्यासाठी म्हाडाने अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी एकदाच कायमची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली खरी पण ती आता अर्ज करणाऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. ऑनलाईन अर्ज भरताना म्हाडाने बारकोड असलेल्या डोमेसाईल प्रमाणपत्राची अट ठेवल्यामुळे पूर्वीचे डोमेसाइल बाद ठरले असून लोकांची फारच तारांबळ उडत आहे.
आता अर्ज करायचा असेल तर नव्याने डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदी घोडे नाचवावे लागणार आहेत. त्यामुळे एक खडकी योजना आणि सेवा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. अनेकांनी तात्काळ सर्टिफिकेटसाठी एजंटचा मार्ग निवडल्याने विनाकारण आर्थिक भूर्दंड बसत आहे.
आपल्या मालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण म्हाडाच्या सोडतीकडे चातकाप्रमाणे वाट पाहतात. पुणे मंडळाच्या सोडतीपाठोपाठ पुढील कालावधीत कोकण आणि मुंबई मंडळाची घरांसाठी सोडत येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने 5 जानेवारीपासून कायमस्वरूपी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. फ्लॅटसाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची प्रक्रिया आयएलएमएस 2.0 या नूतन कम्प्युटर सिस्टिम आधारे करण्यात येत आहे. त्यानुसार अर्जदारांना अर्ज भरतानाच फोटो, ई-स्वाक्षरी, शपथपत्र, डोमेसाईल, स्वीकृती पत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार, पॅन कार्ड आदी सात कागदपत्रे अपलोड करावी लागत आहेत. ही कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. प्रक्रिया सोपी करण्याच्या नादात म्हाडाने प्रक्रिया अत्यंत किचकट केल्यामुळे अर्जदारांमध्ये संतापाची लाट आहे.
नवीन डोमेसाईल सर्टिफिकेटवर बारकोड असून त्याच पद्धतीची म्हाडाच्या नव्या सॉफ्टवेअरची रचना करण्यात आली आहे. पाच वर्षाआधीची डोमेसाईल सर्टिफिकेट ग्राह्य धरली जाणार नाहीत, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नवीन डोमेसाईल काढण्यासाठी चकरा माराव्या लागत असल्याने म्हाडा घरासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी करताना बारकोड असलेल्या डोमेसाईल सर्टिफिकेटअभावी आपली नोंदणी प्रक्रिया रखडू नये यासाठी काही जण एजंटचा पर्याय निवडत आहेत. एजंटदेखील नागरिकांची वाढती मागणी पाहता त्यांच्याकडून अडीच ते साडेतीन हजार रुपये उकळत आहेत, त्यामुळे एजंटची चांदी होत आहे.
या संदर्भात म्हाडाचे डेप्युटी सीईओ (मार्केटिंग) राजेंद्र गायकवाड यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, डोमेसाईल सर्टिफिकेटसाठी धावपळ करण्याची आणि सेवा केंद्राबाहेर गर्दी करण्याची आवश्यकता नाही. आपले सरकार पोर्टलवर जाऊन नागरिक डोमेसाईलसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर मिळालेला टोकन क्रमांक नागरिकांनी म्हाडाची ऑनलाईन नोंदणी करताना समाविष्ट करावा. आम्ही ते तात्पुरत्या स्वरूपात ग्राह्य धरू. परंतु डोमेसाईल मिळाल्यानंतर ते अपलोड करणे बंधनकारक असणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.