MHADA Mumbai Lottery 2023 in marathi : म्हाडाकडून गिरणी कामगारांसाठी 2020 मध्ये घरांची लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांना या लॉटरीत घरे मिळाली होती. या लॉटरीतील विजेत्या गिरणी कामगारांना म्हाडाकडून एक दिलासा मिळाला आहे. कारण, म्हाडाने गिरणी कामगारांना वापल्या घरांच्या विक्री किमतीचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. या संदर्भात म्हाडाने एक पत्रक जाहीर केलं आहे.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) 1 मार्च 2020 रोजी काढण्यात आलेल्या 3894 सदनिकांच्या संगणकीय सोडतीतील यशस्वी पात्र 1369 गिरणी कामगार / वारसांपैकी 1331 गिरणी कामगार/ वारस यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठी तात्पुरते देकार पत्राची प्रत (Provisional Offer Letter) ऑनलाईन मोबाईलवर पाठविण्यात आली आहे. सदनिकेच्या विक्री किंमतीच्या 10 टक्के रकमेचा पहिला हप्ता न भरलेल्या 114 गिरणी कामगार/ वारस यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा पहिला हप्ता भरण्यासाठी 8 मार्च, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच अद्याप तात्पुरते देकार पत्र प्राप्त न केलेल्या 55 गिरणी कामगार / वारस यांनी मूळ टोकन जमा करून बँकेतून तात्पुरते देकार पत्र प्राप्त करून घ्यावे, असेही आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.
हे पण वाचा : मधुमेह असल्यास कोणती फळे खावीत?
मुंबई मंडळाच्या गिरणी कामगार/ वारस संगणकीय सोडत प्रणालीमध्ये अनेक बदल करण्यात आले असून, मंडळाच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन तात्पुरते देकार पत्राची प्रत पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. संगणकीय सोडत प्रणालीतील बदलानुसार यशस्वी पात्र गिरणी कामगार / वारस यांनी मंडळाकडे नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर मंडळातर्फे लिखित संदेश (Text Message) पाठविण्यात आले. या संदेशात तात्पुरते देकार पत्राची प्रत डाउनलोड करावयाची लिंक संबंधित गिरणी कामगार / वारस यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आली. या लिंक वरून पात्र गिरणी कामगार/ वारस यांनी आपल्या स्मार्ट फोनवरून देकार पत्राची प्रत डाउनलोड करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सुमारे 1200 गिरणी कामगार/ वारस यांनी तात्पुरते देकार पत्र बँकेतून घेऊन सदनिकेच्या विक्री किंमतीचा 10 टक्के भरणा केला आहे. तसेच उर्वरित 90 टक्के रकमेचा दुसरा हप्ता भरून एकूण 25 गिरणी कामगार/ वारसांनी या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे.
हे पण वाचा : Weight Loss Drinks: या ड्रिंक्स घ्या अन् करिना सारखा झिरो फिगर मिळवा
सदर 114 व 55 गिरणी कामगार/ वारस यांच्या नावांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादीतील नावे तपासून त्यात नाव असणारे गिरणी कामगार/ वारस यांनी तात्पुरते देकार पत्र मुंब बँकेच्या फोर्ट शाखेतून कार्यालयीन वेळेत प्राप्त करून सदनिकेच्या विक्री किमतीच्या 10 टक्के आणि 90 टक्के रकमेचा भरणा विहित मुदतीत करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करताना प्रती व्यवहार रु. 35.40 अतिरिक्त शुल्क गिरणी कामगार/वारस यांनी भरणे गरजेचे आहे. सदर शुल्काचा भरणा केला जात नसल्याने काही गिरणी कामगार / वारस यांना सदनिकेच्या विक्री किमतीचा 10 टक्के भरणा करण्याची प्रक्रिया करताना अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली असून याची गिरणी कामगार / वारस यांनी नोंद घ्यावी.
हे पण वाचा : 10वी, 12वी पास सुद्धा चालवू शकतात ट्रेन
प्रत्येक गिरणी कामगारांचे तात्पुरते देकार पत्र सिस्टिम जनरेटेड असून लाभधारकास मिळणा-या पत्रावर त्यांचा स्वतंत्र बँक खाते क्रमांक (Virtual Account Number) नमूद करण्यात आला. नमूद बँक खात्यावर त्यांनी आपल्या गाळ्याच्या विक्री किंमतीचा भरणा NEFT / RTGS द्वारे करावयाचा आहे. यापूर्वी गिरणी कामगारांच्या सदनिका सोडतीसाठी तात्पुरते देकार पत्र पोस्टाद्वारे पाठविल्यानंतर गिरणी कामगार / वारस यांचा पत्ता चुकीचा असल्याचा अथवा पत्र वेळेवर न मिळाल्याच्या कारणांनी अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे मंडळाच्या कामकाजात देखील अडवळे निर्माण होत होते.
परंतु, तात्पुरते देकारपत्राची प्रत ऑनलाईन पाठविण्याच्या सुविधेमुळे गिरणी कामगार/ वारस यांना घरबसल्या तात्पुरते देकार पत्र जारी झाल्याची आगाऊ सूचना प्राप्त होत आहे. तात्पुरते देकार पत्राची प्रत ऑनलाईन मिळाल्याच्या तारखेपासून 105 दिवसांत पात्र गिरणी कामगार / वारस यांना सदनिकेच्या विक्री किमतीचा भरणा करावा, असे देकार पत्रात नमूद केले आहे. यामधील 10 टक्के रक्कम पत्र मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आत आणि उर्वरित 90 टक्के रक्कम 60 दिवसात भरावयाची आहे.
गिरणी कामगारांनी विक्री किंमतीचा भरणा करण्याची कार्यवाही लवकर केल्यास सदनिकेचा ताबा देण्यासंदर्भात कार्यवाही गतीने करण्यास मंडळाला निश्चित मदत होणार असल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.