मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा धक्का देणार?

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 05, 2022 | 14:08 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर हे मोठा धक्का देणार का? अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. जाणून घ्या ही चर्चा नेमकी का सुरु आहे.

milind narvekar to give biggest blow to uddhav thackeray narvekar half an hour discussion with shrikant shinde
मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा धक्का देणार? (फाइल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मिलिंद नार्वेकरांची विधानभवन परिसरात श्रीकांत शिंदे सोबत अर्धा तास चर्चा
  • मिलिंद नार्वेकरांबाबत उलटसुलट चर्चांना उधाण
  • मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

मुंबई: शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्री पद गमवावं लागलं आहे. या सगळ्यामुळे शिवसेना प्रचंड अडचणीत सापडली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेत शिवसेना ही सध्या तरी पूर्णपणे खिळखिळी झाली असल्याचं दिसतं आहे. अशावेळी पक्षाला जे मोठं भगदाड पडलं आहे ते नेमकं बुजवायचं कसं असा यक्ष प्रश्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पडलं आहे. 

अशावेळी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ज्यामुळे उद्धव ठाकरे हे अधिकच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

एकनाथ शिंदे यांनी अतिशय अनपेक्षितपणे आपल्याच पक्षातील ४० आमदारांना फोडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद देखील गमवावं लागलं. पण इथेच त्यांच्या मागचं शुक्लकाष्ठ संपलं नाही. तर एक-एक करून त्यांचे अनेक जवळचे लोक त्यांना सोडून जात असल्याचं यावेळी दिसून आलं. अगदी परवापर्यंत उद्धव ठाकरेंसाठी अश्रू ढाळणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी काल अचानक विश्वासदर्शक प्रस्तावावेळी शिंदे गटात सामील झाले. 

या सगळ्यात आता शिवसेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत बराच चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. ही चर्चा विधानसभेच्या आवारातच झाली असल्याने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. 

अधिक वाचा: Sanjay Raut: 'महाराष्ट्रात शिवसेना ही १०० च्या वर जागा जिंकेल', प्रचंड आत्मविश्वासाने राऊतांनी केला दावा

या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. एकीकडे शिंदे विरुद्ध ठाकरे असं राजकीय युद्ध सुरु असताना उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना श्रीकांत शिंदेशी चर्चा करण्याची गरज का पडली? असा सवाल विचारला जात आहे. 

एकीकडे एकेक विश्वासू सहकारी हे उद्धव ठाकरे यांना सोडून जात असताना आता मिलिंद नार्वेकर हे काही वेगळी भूमिका घेतात का? याकडे देखील अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारला होता. त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेशी चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांनाच सूरतला पाठवलं होतं. मात्र, तिथे जाऊन आणि चर्चा करुन नार्वेकरांच्या हाती काहीही लागलं नव्हतं. 

एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर हे सुरुवातीपासूनच एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. या दोघांचेही पक्षातील सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. अशावेळी हे दोन्ही पुन्हा जवळ आल्यास उद्धव ठाकरे यांना खूप मोठा धक्का बसू शकतो. मात्र, सध्या तरी याबाबत फक्त राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. पण मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंपासून दूर झाल्यास त्यांना मोठा धक्का बसू शकतो. 

दरम्यान, आतापर्यंत शिवसेनेत जी काही बंडं झाली त्या-त्यावेळच्या नेत्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आपण शिवसेना सोडत असल्याचं म्हटलं होतं. पण आता तेच मिलिंद नार्वेकर हे स्वत: तर बंडखोरीच्या तयारीत नाही ना? असा सवाल या सगळ्या घडामोडीनंतर अनेक जण विचारत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी