चांगला अधिकारी असेल तर डोक्यावर घेऊ, पण वाईट असेल तर..., पाहा मंत्री बच्चू कडू काय म्हणाले!

मुंबई
रोहित गोळे
Updated Jan 07, 2020 | 14:19 IST

राज्यमंत्री पदाचा कारभार हाती घेण्याआधी आज (मंगळवार) बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सुरुवातीला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

minister of state bacchu kadu warning alert to shirker officers 
चांगला अधिकारी असेल तर डोक्यावर घेऊ, पण वाईट असेल तर...: बच्चू कडू  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना दिला इशारा
  • अधिकाऱ्यांनी फायली दाबून ने ठेवण्याचा बच्चू कडू यांचा इशारा
  • बच्चू कडू यांनी राज्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारण्याआधी केलं रक्तदान

मुंबई: गेले अनेक वर्ष जनतेच्या कामांसाठी थेट सरकार आणि अधिकारी वर्गाला अंगावर घेणारे बच्चू कडू यांची मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात डॅशिंग आमदार अशी ओळख झाली आहे. गेल्या अनेक वर्षात त्यांनी वेगवेगळ्या विषयावर सरकारला धारेवर धरलं होतं. अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या स्टाईलने समज दिली होती. आता मात्र, त्यांचा थेट मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. अशावेळी ते नेमकं कसं काम करतात याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. याचविषयी आत बच्चू कडू यांनी स्वत: माध्यमांकडे आपली भूमिका व्यक्त केली. दरम्यान, बच्चू कडू यांनी राज्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारण्याआधी आज (मंगळवार) रक्तदान केलं.

'चांगल्या अधिकाऱ्यांना डोक्यावर घेऊ'

'जर चांगला अधिकार असेल तर त्याला डोक्यावर घेऊ, पण जर वाईट अधिकारी असेल तर कायदा मोडून त्याच्याकडून लोकांच्या हिताची कामं करु घेऊन.' असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुरुवातीलाच अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे.

'पद कोणतंही असो काम कसं करायचं ते चांगलंच ठाऊक' 

बच्चू कडू यांच्याकडे विविध महत्त्वाच्या खात्यांची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची नेमकी कामगिरी कशी असणार हे देखील पाहिलं जाणार आहे. याबाबत बोलताना बच्चू कडू असं म्हणाले की, 'मला विविध खात्यांची जबाबदारी मिळाली आहे. राज्यमंत्री असो किंवा कॅबिनेट असो कामं आम्ही आमच्या पद्धतीने करु. गेली २५ वर्ष आम्ही संघर्ष केला आहे. त्यामुळे कामं कशी करुवून घेतली जातात हे आम्हाला योग्य पद्धतीने ठाऊक आहे.' असं म्हणत बच्चू कडू यांनी यापुढेही धडाकेबाज पद्धतीनेच काम करु असं सांगितलं आहे. 

अधिकाऱ्यांनी फायली दाबून ठेऊ नयेत, नाहीतर... 

दरम्यान, जे अधिकारी फायली दाबून ठेवतील त्यांची तमा बाळगणार नसल्याचंही यावेळी बच्चू कडू यांनी सांगितलं. 'माझं अधिकाऱ्यांना एकच सांगणं आहे की, त्यांनी कोणतीही फाईल दाबून ठेऊ नये. कोणत्या कारणाशिवाय जर फायली दाबून ठेवल्या तर मात्र मग आम्ही आमच्या पद्धतीने कामं करु. त्यामुळे अधिकाऱ्यांना सेवा आणि हमी कायद्याला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे कायदा तोडणाऱ्यांसाठी आम्ही कायदा हातात घेऊन त्यांना धडा शिकवू. पण उगाचच कोणताही कायदा आम्ही मोडणार नाही. कारण आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की आता आपण महत्त्वाच्या पदी आहोत.' 

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे कोणकोणत्या खात्याची जबाबदारी? 

राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारमध्ये बच्चू कडू यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी बच्चू कड यांच्याकडे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक वि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्यांचा कारभार असणार आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी