मान्सूनपूर्व कामे गतीने करा; आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी तत्पर राहावे – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार असून याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण  द्यावे

vijay wadettiwar
विजय वडेट्टीवार  |  फोटो सौजन्य: BCCL

Vijay Wadettiwar : मुंबई :  सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार असून याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण  द्यावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.आज कोकण व पुणे महसूली विभागातील जिल्ह्यांची मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली. यावेळी मंत्रालय दालनातून आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसनमंत्री श्री. वडेट्टीवार बोलत होते.

मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, आपत्ती कालावधीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय असून, आपत्ती प्रतिसाद यंत्रणा (Incidence Response System) राज्यात लागू करण्यात  येत आहे. आपत्तीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणामध्ये योग्य तो समन्वय राहावा, यासाठी ही यंत्रणा  काम करणार आहे. त्यामुळे या यंत्रणेसाठी लागणारे प्रशिक्षण व इतर माहिती जिल्हांना तात्काळ पुरवावी, अशा सूचना यावेळी श्री. वडेट्टीवार यांनी बैठकीत दिल्या. 

मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात पावसामुळे आपत्तीला तोंड  देत आहोत. यंदाच्या वर्षीही सरासरीपेक्षा जास्त व वेळेपूर्वी पाऊस येणार असल्याचा अंदाज आहे. हा अंदाज पाहून त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती निवारणाची कामे करण्यात यावीत. अचानक येणारे पूर, दरडी कोसळणे आदी आपत्तीला तोंड देण्यासाठी  स्थानिक ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा गतीमान असली पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पूर व अतिवृष्टीमुळे पाणी साठू नये यासाठी ज्या क्षेत्रात नागरीकरण मोठ्या प्रमाणात आहे, तेथे पावसाळ्यापूर्वीची नाले सफाईची, धोकादायक वृक्ष तोडणे अथवा फांद्या तोडणे, रस्ते दुरुस्ती, बांधकामाची कामे पूर्ण करावीत. यंदाही पाऊस लवकर सुरू होणार आहे, हे लक्षात घेता सर्व यंत्रणांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपली आपत्ती यंत्रणा बळकट करावी. विशेषत: मुंबई प्रशासनाचा रेल्वे प्रशासनाशी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. 

मान्सूनपूर्व बैठका, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे, तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करून कोणत्याही प्रकारच्या आपत्ती कालावधीत जिवीत हानी होवू नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. शासनाने मंजूर केलेले कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गतची कामे गतीने करावीत, अशा सूचना यावेळी मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी दिल्या.

कोकण विभागात पावसाळ्यात अनेकदा आपत्ती ओढावते. अशा वेळी स्थानिक ग्रामस्थांची मदत घेऊन तात्काळ मदत पोचविण्यासाठी पथके तयार करण्यात यावीत. या पथकांना लागणारे आवश्यक ते साहित्य पुरविण्यात येईल. तसेच प्रत्येक जिल्हा पातळीवर तरुणांचे पथक तयार करून त्यांना आपत्ती काळातील मदतीसंदर्भातील प्रशिक्षण देण्यात यावे. रायगड येथे राज्य आपत्ती निवारण पथकाचे दल तैनात ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथकही येथे तैनात करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी