आगरकर जयंतीला टिळकांचा फोटो, गोपीचंद पडळकर ट्रोल, पण ते म्हणतात...

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांना चांगलंच ट्रोल केलं जातंय. जाणून घ्या काय घडलंय असं...

Gopichand Padalkar
आगरकर जयंतीला टिळकांचा फोटो, गोपीचंद पडळकर ट्रोल,पण घडलं असं  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सोशल मीडियावर ट्रोल
  • गोपाळ गणेश आगरकरांच्या जयंतीच्या पोस्टमध्ये शेअर केला लोकमान्य टिळकांचा फोटो
  • पडळकरांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोस्टसोबत छेडछाड केल्याचा आरोप

मुंबई: मागील काही काळापासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी त्यांना सोशल मीडियात ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय. घटनाही अशीच घडली आहे. देशातील थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पडळकरांनी एक पोस्ट शेअर केली. मात्र यात चक्क आगरकरांऐवजी लोकमान्य टिळकांचा फोटो त्यांनी वापरला. त्यामुळे नेटिझन्स चांगलेच भडकले आणि पडळकरांना ट्रोल व्हावं लागलं. आपली चूक कळताच त्यांनी ही पोस्ट डिलिट करून आगरकरांचा फोटो टाकून नवीन पोस्ट शेअर केली. 

गोपीचंद पडळकरांना ही पोस्ट टाकल्यानंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय. अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. पण आता ही पोस्ट पडळकरांच्या अकाऊंटवर दिसत नाहीय. तर गोपाळ गणेश आगरकर यांचा फोटो असलेलीच अभिवादनाची पोस्ट पडळकरांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिसतेय. 

या फोटोवरून गोपीचंद पडळकरांचं ट्रोलिंग सुरू

याबाबत एका वृत्तपत्रासोबत बोलतांना गोपीचंद पडळकरांनी हे आपल्या विरुद्ध असलेलं षडयंत्र म्हटलेलं आहे. ते म्हणाले की, मी आगरकरांचाच फोटो पोस्ट केला होता. पण राष्ट्रवादीच्या लोकांनी जाणूनबुजून लोकमान्य टिळकांचा फोटो टाकून खोटी पोस्ट व्हायरल केलीय.  आता यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि गोपीचंद पडळकर पुन्हा आमने-सामने उभे टाकले आहेत. 

गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढला तो, पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर. पडळकरांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच चिडले आणि हा संघर्ष वाढला. गोपीचंद पडळकरांचे अनेक ठिकाणी पुतळे जाळले गेले तर त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली गेली. मात्र या प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांची बाजू सावरत त्यांना असं न बोलण्याचा सल्ला दिला. 

पडळकरांचं प्रकरण ताजं असतांनाच भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनीही शरद पवार यांच्यावर टीका केली. सुजीतसिंह ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत म्हटलं होतं की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळजी पेक्षा भारतीय जनता पक्षाची आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाची अधिक काळजी आहे, असंच त्यांच्या मुलाखतींमधून दिसून येत आहे. त्याचबरोबर शरद पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत किंवा इतर कुठल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, हा देखील प्रश्न त्यातून निर्माण होत आहे.

सुजीतसिंह ठाकूर यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे यांचीही जीभ घसरली. त्यांनी सुजित सिंह ठाकूर यांना मागच्या दारानं आलेला आमदार म्हणत, आजकाल लायकी नसताना देखील पवार यांच्यावर टीका करण्याची फॅशन झाली आहे, असंही ते म्हणाले.

यानंतर पुन्हा एकदा आता गोपीचंद पडळकरांचं ट्रोलिंग.. ही शाब्दिक लढाई अजून किती रंग दाखवणार हे बघावं लागेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी