Amol Mitkari: मुंबई: विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये (MLA) आज (२४ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास जोरदार धक्काबुक्की झाली. यावेळी शिंदे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार हे आमनेसामने आले होते. त्यामुळे काही काळ विधीमंडळ परिसरातील वातावरण तापलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सत्ताधारी आमदारांवर गंभीर आरोप करत आपला संताप व्यक्त केला आहे. (mla of shinde group abused us amol mitkari was angry)
सत्ताधारी आमदारांनी आम्हाला आई-बहिणीवरुन शिविगाळ करत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. असा आरोप करत अमोल मिटकरींनी आपला संताप व्यक्त केला.
'त्यांनी आम्हाला आई-बहिणीवरुन शिविगाळ केली'
'अजितदादांनी नेहमीप्रमाणे सर्व आमदारांना सांगितलं की, तुम्ही कधी ११ वाजता येता कधी १२ वाजता येता त्यापेक्षा नियमाप्रमाणे १०.३० वाजता उपस्थित राहा. त्याठिकाणी सरकारला ओला दुष्काळ जाहीर करणार आहात की नाही. काल एका शेतकऱ्याने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. अशा काही संवेदनशील विषयावर आपण प्रश्न विचारले पाहिजे. त्यानुसार आम्ही सगळे आमदार वेळेवर हजर झालो.' असं अमोल मिटकरी म्हणाले.
अधिक वाचा: Vidhansabha: सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की
'आम्ही आंदोलन करायला पायऱ्यांवर आलो तेव्हा सत्ताधारी पक्ष भाजप आणि शिंदे गटाचे आमदार पायऱ्यांवर आंदोलन करत होते. आम्ही नेहमीप्रमाणे ५० खोके एकदम ओके ही घोषणा दिली. हा घाव गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या वर्मी लागला आहे. कारण महाराष्ट्राच्या तळागाळात मुलांमध्ये भांडणं जरी झाली तरी तिथे ५० खोके एकदम ओके असा वाक्प्रचार सुरु झाला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची प्रतिमा फार मलीन झाली आहे.' असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
'अनिल भाईदास पाटील हे विधानसभेचे मुख्य प्रतोद आहेत आणि आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी गाजरांचा एक हार गळ्यात घातला होता आणि सरकारसमोर एक निदर्शन करण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही शेतकऱ्यांना फक्त गाजर दाखवत आहात का. त्यामुळे आम्ही गाजर घेऊन त्या सरकारमधील आमदारांसमोर आंदोलन करत असताना त्यातील काही आमदार ज्यांच्यामध्ये मसल आणि मनी पॉवर असेल ते त्या ठिकाणी आले ते गोंधळ घालायला लागले आणि आम्हाला धक्काबुक्की करुन पत्रकारांच्या अंगावर लोटायला लागले. काही महिला पत्रकार होत्या त्यांना धक्का लागू नये याची काळजी घेण्याकरिता मी, रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांनी प्रयत्न केला.' असं म्हणत मिटकरींनी आपली बाजू मांडण्याचा यावेळी प्रयत्न केला.
अधिक वाचा: 'UP लव जिहाद कायद्याच्या धर्तीवर राज्यात कायदा करणार का?'
'मात्र, यावेळी त्यांच्यातील काही आमदारांनी अप्रत्यक्षपणे आमच्या आई-बहिणीला अप्रत्यक्षपणे शिविगाळ केली. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. तेच आमदार इथे येऊन म्हणतायेत की, आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही शिंगावर घेऊ. आमच्या कोणी नादाला लागलं तर त्याचा नाद काढू. तुमच्या शिंगावर कोण येणार बाबा.. जळीस्थळी काष्टीप-पाषाणी तुमचं सरकार आहे.' असा टोलाही यावेळी मिटकरींनी लगावला.
'उद्या अधिवेशन संपणार आहे मग तुम्ही शेतकऱ्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करणार आहात की नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या मुद्द्यावर आम्ही प्रश्न विचार होतो.'
'याच ठिकाणी त्यांनी घोषणा दिल्या होत्या की, दाऊद के गद्दारो को, जुते मारो सालो को.. अशी नारेबाजी केली. त्यावेळी आम्ही त्यांना कुठे प्रतिक्रिया दिली होती का? उत्तरही दिलं नव्हतं. आम्ही संयम ठेवला.' असंही मिटकरी यावेळी म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.