मुंबई: कोरोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. राज्य सरकारनेही गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र राज्यातील भाजप आणि मनसेने दहीहंडी साजरी करण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे मनसेने स्पष्ट केले होते. पोलिसांनी नेत्यांसह मंडळांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला होता. तरीही मनसेने मुंबईसह ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मध्यरात्रीच कोरोना निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली आहे.
तर दुसरीकडे भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील आम्ही दहीहंडी फोडणारच असे म्हटले आहे. आम्ही घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये पारंपारिक दहीहंडी साजरी करण्यासंदर्भात निघत आहोत. मात्र आम्हाला घरीच स्थानबद्ध करण्याची तयारी सरकार करत आहे. काहीही झाले तरी दहीहंडी होणारच, असे कदम यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी मंडळांची बैठक घेतली होती. कोरोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यासह, मुंबईत अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडी उभारली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडा फडकवला.
ठाण्यात दहिहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू, असे मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटले होते. दहीहंडी साजरी करण्यावरून ठाण्याचे मनसे प्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देशपांडे यांनी ही भूमिका घेतली होती. त्यानंतर ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे दहीडंडी फोडत राज्य सरकारच्या निर्बंधांचा निषेध करण्यात आला. तर सरकारच्या अटीला झुगारून मनसेने घाटकोपर येथील भटवाडी येथे राजू सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोपाळकाला साजरा करण्यात आला.
मनसेच्या अमेय खोपकर यांनी फेसबुक पोस्ट करत दहीहंडीचे थर लागणारच असं म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रचंड गर्दी - सरकारची डोळेझाक. युवासेना कार्यकर्त्यांचा मोठा जमाव राणेंच्या घराबाहेर धुडगूस घालतो - सरकारचं दुर्लक्ष सरकारी प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमांना नियमबाह्य गर्दी. सरकारला फरकच पडत नाही. राज्यभर राजकीय मेळावे तुडुंब गर्दीत सुरुच. सरकारची आळीमिळी गुपचिळी. मग आम्ही आमचे सण साजरे का करायचे नाहीत? असा सवाल त्यांनी केला होता.
दादर आणि ठाण्यात आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच… नियम आणि बंधनं फक्त सामान्यांना. असले तुघलकी प्रकार आता बस्स झाले. हिंमत असेल तर तीनचाकी सरकारने आम्हाला रोखून दाखवावं. दहीहंडीचे थर लागणारच. गोविंदांचा आवाज मुंबईत दुमदुमणार, असं खोपकर यांनी म्हटलं होतं.
नाशिकमध्येही मनसे कार्यकर्त्यांनी दहीहंडी फोडून सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. सत्तेत असलेल्या पक्षाचे कार्यक्रम होतात मग हिंदू सणावर बंदी का असा सवाल देखील यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर आम्ही असे निर्बंध पाळणार नसल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. नियम धुडकावून दहीहंडी साजरी करण्याच्या तयारीत असलेल्या मंडळांना आणि राजकीय नेत्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या होत्या. या नोटिसांनंतरही आता दहीहंडी साजरी करण्यात आल्याने पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.