हीच ती वेळ, म्हणजे गेली पाच वर्ष नव्हता का यांना वेळ?, राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला

मुंबई
Pooja Vichare
Updated Oct 13, 2019 | 21:26 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची दहिसरमध्ये येथे सभा सुरू आहे. राज ठाकरे यांनी भाजप शिवसेना सरकारवर जोरदार तीव्र शब्दांत टीका केली आहे.

Raj Thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे  
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची दहिसरमध्ये येथे सभा झाली.
  • राज ठाकरे यांनी भाजप शिवसेना सरकारवर जोरदार तीव्र शब्दांत टीका केली आहे.
  • शिवसेनेच्या वचननाम्यात आरेविषयी एकही ओळ नाहीः राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची दहिसरमध्ये येथे सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी भाजप शिवसेना सरकारवर जोरदार तीव्र शब्दांत टीका केली आहे.


राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

  1. शिवसेना-भाजपच्या जाहिराती पहा, सगळीकडे लिहिलंय 'हीच ती वेळ' म्हणजे गेली ५ वर्ष नव्हता का ह्यांना वेळ? ह्या नेत्यांच्या आर्थिक हितसंबंधांची फक्त राजीनाम्याच्या धमक्या दिल्या गेल्या. 
  2. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे दाद मागितली तर न्याय मिळतोच म्हणून लोकं आमच्याकडे कुठलाही नागरी प्रश्न अडला तर येतात आणि आम्ही आंदोलनं करतो आणि न्याय मिळवून देतो. 
  3. २०१४ च्या जाहीरनाम्यात सांगतात की, सहकाराला बळकट करण्यासाठी आणि ह्या व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी विशेष कायदा आणू असं भाजप म्हणाले आणि जी पीएमसी बँक बुडली त्यावर भाजपचे नेते आहेत आणि सिटी कॉऑप बँकेवर शिवसेनेचे नेते आणि हे गप्पा मारतात भ्रष्टाचार दूर करण्याच्या.
  4. रिझर्व्ह बँकेकडून सरकार पैसे काढून घेऊ शकतो पण लोकं त्यांच्या हक्काच्या ठेवी बँकेतून काढून घेऊ शकत नाहीत, हा काय प्रकार आहे? लोकांकडे शिक्षणाला, त्यांच्या मुलांच्या लग्नाला, आजारपणाला पैसे नाहीत... ह्या असल्या गोष्टींसाठी सरकार ह्यांच्या हातात द्यायची?
  5. आज जी मुलं-मुली कॉलेजला आहेत त्याना पुढे शिक्षण झाल्यावर नोकऱ्या मिळण्याची शाश्वती नाही, ह्यासाठी तुम्ही मतदान करता असल्या नालायक लोकांना ? 
  6. काश्मीरमधलं ३७० कलम हटवलं ह्यावर भाजप महाराष्ट्रात मतदान मागत आहेत; कलम ३७० काढलंत, तुमचं अभिनंदन, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर बोला.. भाजपला माहित आहे की भावनिक मुद्द्यांवर मतदान लोकं मतदान करणार, बाकी त्यांना खड्ड्यात ठेवा, त्यांच्या नोकऱ्या गेल्या तरी लोकांना फरक पडत नाहीत
  7. नाशिकमधल्या रस्त्यांवर खड्डे पडले नाहीत कारण कंत्राटदारांना आपण सांगितलं होतं की रस्त्यावर खड्डे पडले तर त्या खड्ड्यात उभं करू,शहराचा पाण्याचा प्रश्न आपण मुकणे धरणातून थेट पाईपलाईन आणून सोडवला, घनकचऱ्याचा प्रश्न सोडवला. तरीही लोकं कामांवर मतदान करत नाहीत भावनिक मुद्द्यांवर करतात.
  8. आरेतलं जंगल रातोरात तोडलं, लोकांनी आक्रोश केला पण ह्यावर उद्धव ठाकरे झाडं तोडल्यावर म्हणतात की सत्तेत आल्यावर आरे जंगल म्हणून घोषित करू; आता काय तिकडे गवत लावणार? काहीही बोलतात.
  9. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कशासाठी? कोणाला हवी आहे बुलेट ट्रेन? एक लाख दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज काढून ही ट्रेन उभी करणार काय साध्य होणार?
  10. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात उभारणार होते त्यासाठी काय तर जलपूजन करून परत आले? काय झालं स्मारकाचं पुढे? का नाही उभं केलं? मी नेहमी सांगत आलोय पुतळे उभारण्यापेक्षा महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले गड किल्ले आहेत ते आधी नीट राखा.
  11. मी आंदोलनं अर्धवट सोडली म्हणता? मला सांगा कोणतं आंदोलन अर्धवट सोडलं? महाराष्ट्राला लुटणाऱ्या टोल नाक्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं म्हणून महाराष्ट्रातले ७८ टोल नाके बंद झाले.
  12. एल्फिन्स्टन स्थानकाच्या दुर्दैवी घटनेनंतर आम्ही मुंबईतल्या रेल्वे मुख्यालयावर मोर्चा काढला.आमच्या आंदोलनामुळे १५ दिवसांत स्टेशन परिसर फेरीवालेमुक्त झाले, पुढे सरकारने ह्या फेरीवाल्यांना मोकळं रान दिलं म्हणून पुन्हा स्टेशन परिसरात फेरीवाले बसू लागले, का नाही सरकारला प्रश्न विचारत?
  13. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यामुळे मराठी चित्रपटांना प्राईम टाइम मिळू लागला, रेल्वे भरतीच्या आंदोलनामुळे मराठी तरुण तरुणींना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या. ह्या रेल्वे आंदोलनाच्या वेळेस माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर केसेस टाकल्या.
  14. गुजरातमध्ये जेव्हा भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी अल्पेश ठाकोरने बिहारी माणसांच्या विरोधात हिंसक आंदोलन केलं आणि २० हजार बिहारी माणसांना गुजरात बाहेर हाकललं, का नाही अल्पेश ठाकोरवर केसेस दाखल झाल्या? त्यांना का नाही व्हिलन ठरवलं गेलं? आणि तेच अल्पेश ठाकोर भाजपमध्ये प्रवेश करतात. 
  15. आपण आपलं स्वत्व विसरलोय. मराठेशाहीने अटकेपार झेंडे फडकवले पण असा पराक्रमी महाराष्ट्र हतबल होऊन बसलाय? असल्या थंड लोकांचं नेतृत्व मला नाही करायला आवडणार? थंड बसून कोणाहीकडून अन्याय सहन करणार असाल तर कशाला महाराजांचं नाव घ्यायचं? बदल करायचा नसेल तर का मतदान करायचं?
  16. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या भ्रष्टाचारी लोकांना भाजपने तिकिटं दिली, मग काय बदल झाला? काय बदल होणार आहे? हा बदल व्हायला हवा म्हणून येत्या २१ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा कारण माझ्या उमेदवाराच्या मनात सरकारविरोधात राग आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी