MNS effect, Recitation of 'Hanuman Chalisa' through loudspeaker in Ghatkopar Mumbai : मुंबई : मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा नाही तर आम्ही लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' लावू असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या सभेत दिला होता. हा इशारा मनसेने प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली आहे. घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' पठण सुरू केले आहे.
देशातील अनेक कोर्टांनी मशिदींवरील अजान ऐकविणारे भोंगे बेकायदेशीर असून ते हटवावे अशा स्वरुपाचे निर्णय दिले आहेत. भोग्यांमुळे ध्वनीप्रदूषण होते हे पण एक कारण दिले जाते. पण आजही अनेक मशिदींवर भोंगे अर्थात लाऊडस्पीकर आणि स्पीकर कायम आहेत. या भोंग्यांवरून दररोज पाच वेळा अजान ऐकवली जाते. उघडपणे हा बेकायदा प्रकार सुरू आहे पण या विरोधात अद्याप कारवाई झालेली नाही. मुंबईच्या पूर्व उपनगारत घाटकोपरमध्येही हीच स्थिती आहे. या प्रकाराविरोधात मनसे आता आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' पठण सुरू केले आहे. मनसे दिवसभर लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा', 'गायत्री मंत्र', 'गणपतीची आरती' लावणार आहे, असे घाटकोपरमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे.
मशिदींवरचे भोंगे हटविले जाणार नसतील तर 'हनुमान चालीसा' पठण सुरू राहील असा इशारा मनसेने दिला आहे. मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्याने मनसेच्या घाटकोपरमधील शाखांबाहेर बंदोबस्त ठेवला आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज भारतीय यांनी मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांबद्दल आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्या, अशी मागणी करणारे ट्वीट मोहित कंबोज भारतीय यांनी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना टॅग करून केले होते. आता मनसेनेही भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या या भूमिकेसाठी मोहित कंबोज भारतीय यांनी राज ठाकरे आणि मनसेचे जाहीर आभार मानले आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.