'या' किल्ल्यासाठी मनसे आमदाराची लाखो रुपयांची मदत! 

मुंबई
रोहित गोळे
Updated Sep 08, 2020 | 09:18 IST

Pratapgad: यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माचीखालील डोंगर खचल्याने आता त्याच्या दुरुस्तीचे काम काही तरुणांनी हाती घेतलं आहे. ज्यासाठी मनसे आमदाराने सढळ हस्ते मदत केली आहे. 

Raju patil
मनसे आमदार राजू पाटील  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मनसे आमदाराकडून प्रतापगडच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची मदत
  • राज ठाकरे यांचा सुरुवातीपासूनच किल्ले संवर्धनाचा नारा
  • लोकवर्गणीतून सुरु आहे प्रतापगडाच्या दुरुस्तीचं काम

डोंबिवली: राज्यातील अनेक गडकोट हे सध्या चांगल्या स्थितीत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या या गड-किल्ल्याची (Fort) अवस्था आज अत्यंत बिकट आहे. अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या दुरुस्तीचं कामं सुरु देखील आहेत मात्र, त्याला म्हणावा तसा निधी उपलब्ध होत नसल्याने हे गड-किल्ले नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, असं असलं तरी काही तरुणांनी आपला हा जाज्वल्य इतिहास असाच लुप्त होऊ नये यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी किल्ले दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे. ज्याला आता मनसे  (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांची सुद्धा साथ लाभली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या कारकीर्दीत प्रतापगड (Pratapgad) या किल्ल्याचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे. कारण याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. त्यामुळे आजही लाखो-करोडो शिवभक्तांसाठी हा किल्ला एक प्रेरणास्थान आहे. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माचीखालचा डोंगर खचला आहे. आणि त्याच्याच दुरुस्तीचे काम हे सह्याद्री प्रतिष्ठानने हाती घेतले आहे. हे काम लोक वर्गणीमधून सुरू झाले असून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या कामाला पाच लाख रुपयांची मदत केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गडकिल्ल्यांवरील प्रेम हे जगजाहीर आहे. गडकिल्ले वाचवले पाहिजेत आणि त्यांचे संवर्धन केले पाहिजे असे नेहमीच राज ठाकरे सांगत असतात. त्यालाच अनुसरून प्रतापगडाच्या माची खालच्या डोंगर दुरुस्तीसाठी मनसे आमदार यांनी मदत केली आहे.  

देशभरातील दुर्गप्रेमींचे आवडते ठिकाण असलेल्या प्रतापगडाच्या माचीची वळणदार तटबंदी ही दुर्ग बांधणीतला परमोच्च आविष्कार मानली जाते. यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माचीच्या तटबंदीतील डोंगर खचला आहे. त्याच्या दुरुस्तीला एकवीस लाख रुपयांचा खर्च असून सह्याद्री प्रतिष्ठान लोकवर्गणी काम करायचे ठरवले आणि त्याला नागरिकांनी मदत करायला सुरुवात केली आहे. तसेच मनसेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी ही आर्थिक मदत केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी