मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. नुकतीच राज ठाकरे यांची एक शस्त्रक्रिया पार पडली. याच निमित्ताने त्यांची विचारपूस करण्यासाठी फडणवीस हे शिवतीर्थावर गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली असल्याचं समजतं आहे.
राज्यात सरकार स्थापन झालेल असलं तरीही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे आजच्या भेटीत राज ठाकरे यांच्यासोबत मंत्रिमंडळात मनसेला स्थान देण्याबाबत काही चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मनसेच्या एकमेव आमदाराला मंत्रिपद?
2019 विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली होती. मात्र, त्यावेळी झालेल्या सत्ताबदलानंतर फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक खूपच वाढली होती.
आता देखील देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद हुकल्यानंतर राज ठाकरे यांनी एक पत्र फडणवीसांना लिहलं होतं. ज्यामध्ये राज ठाकरेंनी फडणवीसांचं तोंड भरुन कौतुक केलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत मनसेला मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.
सध्या विधानसभेत मनसेचे एकच आमदार आहे. कल्याण ग्रामीणचे राजू पाटील हे विधानसभेत मनसेचं नेतृत्व करत आहेत. विश्वासदर्शक प्रस्तावावेळी त्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं होतं. असं असताना जर फडणवीसांना मनसेला मंत्रिमंडळात स्थान दिलं तर एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते.
अधिक वाचा: मनसेच्या मते, उद्धव ठाकरेंबरोबर जे झालं ते चांगलचं झालं; सत्ता जाण्यावरून MNS नं स्पष्ट केली भूमिका
मात्र, सध्या या सगळ्या शक्यता आणि अंदाज आहेत. आज फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
शिवसेनेची पुरती कोंडी करण्यासाठी फडणवीसांची खेळी?
२०१९ विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीस यांना आपलं मुख्यमंत्री पद गमवावं लागलं होतं. ती सल देवेंद्र फडणवीस यांच्या मनात कायम आहे. त्यामुळेच आता शिवसेनेला सर्व बाजूने नामोहरम करण्यासाठी फडणवीस हे सातत्याने नवनवे डाव टाकत असल्याचं पाहायला मिळतं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला एकनाथ शिंदे या फोडून मूळ शिवसेना खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधून मुंबईतील शिवसेनेची ताकद देखील संपविण्याचा दुसरा प्रयत्न फडणवीस करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरे यांनी देखील शिवसेना सोडताना उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला होता. त्यामुळे फडणवीस आणि राज ठाकरे यांचा आजच्या घडीला तरी एकच राजकीय शत्रू आहे. याच शत्रूला पूर्णपणे पराभूत करण्यासाठी फडणवीसांनी नवी खेळी सुरु केली असल्याचं बोललं जात आहे.
फडणवीसांचा भगवी शाल देऊन सत्कार
देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा शिवतीर्थावर खास सत्कार करण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी भगवी शाल देऊन फडणवीस यांचं आदरातिथ्य केलं. तर त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी फडणवीसांचं औक्षण केलं.
अधिक वाचा: Viral Video : मुंबईत मनसेचे नगरसेवक फोडणाऱ्या शिवसेनेला आठवले राज ठाकरेंचे शब्द
मागील काही महिन्यांपासून राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यांच्या अचानक बदलेल्या भूमिकेमागे भाजपचा हात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. सध्या राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी घट्ट मैत्री झाल्याचं दिसतं आहे. या सगळ्याचा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत नेमका काय फरक पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.