Raj Thackeray Kohinoor Mill Case: मनसेकडून मुंबई ठाण्यात सरकारविरोधात पोस्टरबाजी

मुंबई
Updated Aug 20, 2019 | 10:03 IST

राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी ईडीकडून नोटीस आल्यानंतर मनसैनिक भलतेच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई ठाण्यात पोस्टर लावून पाठिंबा दिला आहे. 

Mns poster
Raj Thackeray Kohinoor Mills Case: मनसेची मुंबई ठाण्यात पोस्टरबाजी  

थोडं पण कामाचं

  • मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबई ठाण्यात पोस्टरबाजी
  • मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंसोबत ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणार
  • मनसेने पुकारलेला ठाणे बंद मागे घेण्यात आला
  • २२ ऑग्स्टला पुकारण्यात आलेला बंद मनसेने मागे घेण्याची केली घोषणा
  • राज ठाकरेंना २२ ऑगस्टला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस पाठवल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. कोहिनूर मिल प्रकरणात राज ठाकरेंना २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. यानंतर राजकारणात एकच गोंधळ उडाला. अनेक राजकीय नेते मंडळी तसंच मनसेचं कार्यकर्ते सरकारविरोधात आक्रमक होताना दिसले. याचवेळी अनेक नेते मंडळींनी राज ठाकरेंना आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यातच मनसेचे कार्यक्रर्ते बरेच आक्रमक होताना दिसले. ईडीची नोटीस पाठवल्यानंतर तात्काळ मनसेनं ठाणे कल्याणमध्ये गुरूवारी बंदचं आवाहन केलं. मात्र राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला. आता राज ठाकरे यांना पाठिंबा मनसेनं मुंबई ठाण्यात पोस्टरबाजी केली आहे. 

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि ठाण्यात पोस्टर्स लावत राज ठाकरेंना पाठिंबा देत सरकारवर आगपाखड केली आहे. मनसेनं आपल्या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, एका गोष्टीचं लक्ष असू द्या चौकशी कोहिनूर मिलची नव्हे... तर मराठी माणसाच्या हृदयातील कोहिनूर हिऱ्याची करताय!  महाराष्ट्र सैनिक- अखिल चित्रे 

तसंच या नोटीसविरोधात मनसेनं ट्विटरवरूनही मोदी- शहांना चिमटा काढला आहे. याआधी राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून मोदी शहांवर टीका केली आहे. याच व्यंगचित्राचा एक व्हिडिओ मनसेनं ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना मनसेनं कॅप्शन दिलं की, कुंचल्याच्या मऊसूत स्पर्शाने सुद्धा इतके घायाळ?. असं म्हणत मनसेनं मोदी शहांना टोला लगावला आहे. 

 

 

राज ठाकरेंच्या सूचनेनंतर बंद मागे 

राज ठाकरे यांनी ईडीनं नोटीस पाठवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये बराच असंतोष निर्माण झाला. यामुळे सरकारविरोधात ठाणे बंदचं आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी बंद मागे घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर तात्काळ कार्यकर्त्यांनी बंद घेतल्याचं घोषित केलं. लोकांना त्रास होईल, असं काही करून नका, अशा सूचना दिल्या. 

मनसे नेत्यांची बैठक पार 

ईडीच्या नोटीशीनंतर मनसे नेत्यांची बैठक सोमवारी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी घेण्यात आली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बंद मागे घेण्याच्या सूचना केल्या. सामान्य जनतेला त्रास होऊ नये असं म्हणत राज ठाकरेंनी बंद मागे घेण्यास सांगितलं. कारण, बंद दरम्यान, ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास तरी हा बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नेमकं प्रकरण काय आहे? 

राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी एकत्रित दादर इथल्या कोहिनूर स्क्वेअरसाठी मिलची जागा खरेदी केली होती. त्यासाठी आयएलएफएसकडून (ILFS) कर्ज घेण्यात आलं होतं. सरकारी क्षेत्रातली कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अॅड फायनान्शियर सर्व्हिसद्वारे कोहिनूर सीटीएनएल कंपनीला ८६० कोटी रूपयांचं कर्ज दिलं होतं. पण त्यानंतर आयएलएफएसला मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर राज ठाकरेंनी २००८ ला या प्रकरणातेल स्वतःचे सर्व शेअर्स विकले. मात्र त्यानंतरही राज ठाकरे यांनी कंपनीत सक्रिय आहेत असं सांगत या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं नोटीस पाठवली असून या प्रकरणात चौकशी करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...