money laundering in cm's relative's company : मुंबई : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या किरीट सोमय्या यांनी केला. या कंपनीशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काय संबंध आहे ते स्वतः त्यांनीच जाहीर करावे; असे किरीट सोमय्या म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची ‘श्रीजी होम्स’ नावाची रिअल इस्टेट कंपनी आहे. या कंपनीने मुंबईत शिवाजी पार्क परिसरात कोट्यवधी रुपयांची इमारत बांधली आहे. या कंपनीच्या माध्यमातून २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपयांचे मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.
आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचे हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीसोबत अनेक आर्थिक व्यवहार झाले आहेत. सध्या नंदकिशोर चतुर्वेदी फरार आहे. तपास यंत्रणा नंदकिशोर चतुर्वेदीला शोधत आहेत. चतुर्वेदीने कोट्यवधी रुपयांचे मनी लाँड्रिंग केले आहे. ठाकरे सरकारने भ्रष्टाचार करून लुटलेल्या पैशांची व्यवस्था लावण्याचे काम नंदकिशोर चतुर्वेदी ही व्यक्ती मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपविले आहे, असा प्रश्न सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून उपस्थित केला. आदित्य ठाकरे आणि चतुर्वेदी यांच्या तीन कंपन्या आहेत; असेही सोमय्या म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम करणारे प्रविण कलमे यांनी माझ्याविरोधात तक्रारी केल्या, उच्च न्यायालयात अनेक आरोप केले. विशेष म्हणजे या प्रविण कलमेंना सरकारच्या अखत्यारितील एसआरएच्या कार्यालयातून कागदपत्रांची चोरी करताना पकडण्यात आले. एसआरएच्या मुख्य अधिकाऱ्यांनी प्रविण कलमेंविरुद्ध तक्रार दाखल केली. पण अद्याप या प्रकरणात कारवाई झालेली नाही. सध्या प्रविण कलमे कुठे आहेत, ते देशाबाहेर फरार झाले आहेत का, त्यांना पळून जाण्यासाठी कोणी मदत केली आहे का; असेही प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आक्रमक पवित्रा घेत किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे सरकारला जाब विचारला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.