MPSC exams postponed: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढे नव्याने जाहीर होणाऱ्या परीक्षेस बसता येणार असून कुणीही अपात्र ठरणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि विविध घटकांशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, जलसंपदा जयंत पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई उपस्थित होते.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावर आक्रमक झालेल्या मराठा संघटनांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. मराठा संघटनांकडून या प्रकरणी राज्य सरकारसोबत चर्चाही झाली होती. या चर्चेनंतर राज्य सरकारची एक बैठक झाली. या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये, अभ्यासिका वर्ग बंद आहेत. या परिस्थितीचा तसेच विविध घटकांकडून, विद्यार्थ्यांकडून आलेल्या सूचनांचा सारासार विचार करून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वीही दोन वेळेस ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि काही उमेदवार कोरोनाग्रस्त असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचा सुधारित कार्यक्रम राज्य लोकसेवा आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. ११ ऑक्टोबर २०२० च्या परीक्षेत प्रवेश पत्र देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांस सुधारित दिनांकाच्या परीक्षेत बसता येईल. म्हणजेच जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणण्याचा दिनांक १ एप्रिल २०२० हाच कायम राहील.
आता एमपीएससीकडून परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात येईल. यावेळी जी तारीख जाहीर करण्यात येईल त्या तारखेला ही परीक्षा निश्चित होईल. या परीक्षेला बसण्यास जे विद्यार्थी पात्र आहेत ते या परीक्षेला बसण्यास पात्र असतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
MPSCची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यावर छत्रपती संभाजी यांनी ट्वीट करुन सरकारचे आभार मानले आहेत. छत्रपती संभाची यांनी ट्वीट करत म्हटलं "मराठा समाजाच्या भावना समजून MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला याबद्दल मराठा समाजाच्या वतीने सरकारचे सर्वप्रथम आभार!"
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.