MPSC Exams: मी वचन देतो, आठवड्याभरात परीक्षा होणार - मुख्यमंत्री

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 11, 2021 | 21:42 IST

MPSC exams: एमपीएससीमार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या परीक्षेच्या तारखेवर भाष्य केलं आहे.

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

 • एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली
 • परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा संताप, विरोधी पक्ष नेतेही आक्रमक
 • एमपीएससी परीक्षेची नवीन तारीख उद्या जाहीर करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती

MPSC exams: एमपीएससी (MPSC) म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharahtra Public Service Commission)मार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी प्रचंड संतापले. राज्यभरातील विविध शहरांत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. तसेच विरोधी पक्षांनीही आक्रमक भूमिका घेतली. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत परीक्षेच्या नवीन तारखेबाबत भाष्य केलं आहे. नवीन तारीख उद्या (१२ मार्च २०२१) रोजी जाहीर करण्यात येणार अशी माहितीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

मी वचन देतो, आठवड्याभरात परीक्षा होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी माझ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींना मनापासून सांगतो, विनंती करतो की, उगाच कोणी भडकवतो म्हणून भडकून जाऊ नका. आपण जो अभ्यास करत आहात तो अभ्यास करत रहा. मी तुम्हाला वचन देतो की येत्या आठवड्याभरात ही परीक्षा होईल.

येत्या आठ दिवसांत एमपीएससीची परीक्षा होणार

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी एमपीएससी परीक्षेची तारीख जाहीर झाली होती आणि नंतर ही तारीख पुढे ढकलली होती. ही परीक्षा पुढे ढकलत असताना मी सांगितलं होतं की, नवी तारीख कोणत्याही परीस्थितीत पुढे ढकलली जाणार नाही आणि त्यानंतर १४ मार्च ही तारीख जाहीर करण्यात आली होती. पण आता तारीख पुढे ढकलण्यात आली आहे ती एक महिना दोन महिना पुढे ढकलण्यात आढळलेली नाहीये. तर केवळ काही दिवसांसाठी करत आहोत. मी आज स्वत: मुख्य सचिवांना आणि एमपीएससीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की, या तारखांबाबतचा घोळ संपवा आणि उद्या ही तारीख झालीच पाहीजे. तसेच ही तारीख येत्या आठ दिवसांतलीच असली पाहिजे."

आठवड्याभरात परीक्षा, मग परीक्षा पुढे का ढकलली?

मुख्यमंत्री म्हणाले, परीक्षा पुढे ढकलली याचं कारण कोविडचंच आहे. आपल्याला कल्पना असेल या परीक्षेचा संपूर्ण यंत्रणा लावावी लागते ती शासकीय यंत्रणाच आहे. विद्यार्थी आल्यानंतर त्यांचे सीट नंबर पाहून बसण्याची व्यवस्था करणे, प्रश्नपत्रिका संच देणे, सूपरवायझर या सर्व गोष्टींसाठी कर्मचारी वर्ग आवश्यक असतो. या कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट करणं आवश्यक आहे. ही टेस्ट झाली आहे का? माझं तर मत आहे की, ज्यांना कोविड प्रतिबंधक लस दिली आहे त्या कर्मचाऱ्यांनाच या परीक्षेसाठी दिले जावेत अशा माझ्या सूचना आहेत. म्हणजेच विद्यार्थी परीक्षेला आल्यावर त्याच्यावर दडपण असून नये की, आपल्याला जो व्यक्ती पेपर वाटत आहे तो तर कोरोना बाधित नाहीये ना? तो व्यक्ती कोरोना बाधित असल्याची शंका मनात येऊ नये.

मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे

 1. एमपीएससीच्या परीक्षेची नवी तारीख उद्या जाहीर करणार
 2. येत्या आठ दिवसांत एमपीएससीची परीक्षा होणार
 3. कोरोनामुळे १४ मार्च रोजीची परीक्षा पुढे ढकलली 
 4. परीक्षेवरुन विरोधकांनी राजकारण करु नये
 5. परीक्षार्थींनी आपली तयारी सुरू ठेवावी
 6. मी वचन देतो, आठवड्याभरात परीक्षा होणार
 7. वयाची मर्यादा आडवी येणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
 8. कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय. जे कर्मचारी माझ्या विद्यार्थ्यांच्या सोबत असतील त्यांची कोविड टेस्ट करणं गरजेचं आहे
 9. ज्यांना लस दिली आहे असे कर्मचारी या परीक्षेसाठी दिले जावेत अशा माझ्या सूचना आहेत 
 10. आपली थोडीशी गैरसोय झाली आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो

राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही नियोजित वेळापत्रकानुसार १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणार होती. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने एमपीएससीने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. या संदर्भात एमपीएससीने ११ मार्च २०२१ रोजी सकाळी एक प्रसिद्ध पत्रक काढलं आहे.

MPSCने आपल्या प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलंय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी दिनांक १४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक १० मार्च २०२१ रोजीच्या पत्राद्वारे आयोगास खालीलप्रमाणे कळविण्यात आले आहे. "राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी." शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही पुढे ढकलण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी