एसटी महामंडळाच्या ३४ हजार कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 16, 2022 | 09:12 IST

msrtc 34 thousand workers strike continues : एसटी महामंडळाच्या ८१ हजार ६८३ कर्मचाऱ्यांपैकी ३४ हजार कर्मचारी अद्याप संपावर आहेत. यात चालक आणि वाहक कर्मचारी यांची संख्या लक्षणीय आहे.

msrtc 34 thousand workers strike continues
एसटी महामंडळाच्या ३४ हजार कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एसटी महामंडळाच्या ३४ हजार कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरू
  • चालक आणि वाहक कर्मचारी यांची संख्या लक्षणीय
  • कर्मचाऱ्यांच्या अभावी एसटीच्या १६ हजार फेऱ्या झालेल्या नाहीत

msrtc 34 thousand workers strike continues : मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एमएसआरटीसी वा एसटी महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation - MSRTC) यांच्या ८१ हजार ६८३ कर्मचाऱ्यांपैकी ३४ हजार कर्मचारी अद्याप संपावर आहेत. यात चालक आणि वाहक कर्मचारी यांची संख्या लक्षणीय आहे. संपावर असलेले ३४ हजार कर्मचारी शुक्रवार १५ एप्रिल २०२२ पर्यंत कामावर परतले नव्हते. हे कर्मचारी २२ एप्रिल २०२२ पर्यंत परततील अशी आशा महामंडळाला आहे. कर्मचाऱ्यांच्या अभावी एसटीच्या १६ हजार फेऱ्या झालेल्या नाहीत. ग्रामीण भागात नागरिकांचे हाल होत आहेत. पण राज्य शासन आणि एसटी महामंडळाचे कर्मचारी यांच्यातील तिढा अद्याप सुटलेला नाही.

एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन, भत्ते, वैद्यकीय सुविधा आदी द्यावे तसेच थकीत वेतन द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी संपावर आहेत. संप २८ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू आहे. संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आधी १५ एप्रिल २०२२ पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. नंतर मुंबईच्या उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीअंती संपावर असलेल्यांना २२ एप्रिल २०२२ पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. जे कर्मचारी २२ एप्रिल पर्यंत कामावर परत रुजू होतील त्यांच्यावर कारवाई करू नये असे निर्देश उच्च न्यायालयाने एसटी महामंडळाला दिले आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे 'गॉडफादर' शरद पवार यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याची ठाम भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. शासनाची ही आक्रमक भूमिका लक्षात आल्यानंतर एसटी महामंडळाचे ३४ हजार कर्मचारी अद्याप कामावर परतले नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी