संप सुरू, बोलणी फिस्कटली; एसटीचे २९३७ कर्मचारी निलंबित

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 21, 2021 | 11:08 IST

MSRTC workers Strike, MSRTC suspending more staffers महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तोडगा काढण्यासाठी शनिवार २० नोव्हेंबर २०२१ रोजी झालेली बोलणी फिस्कटली. महामंडळाच्या प्रशासनाने आतापर्यंत २९३७ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

MSRTC workers Strike, MSRTC suspending more staffers
संप सुरू, बोलणी फिस्कटली; एसटीचे २९३७ कर्मचारी निलंबित 
थोडं पण कामाचं
  • संप सुरू, बोलणी फिस्कटली; एसटीचे २९३७ कर्मचारी निलंबित
  • एसटी महामंडळ विलीन करण्याबाबत बारा आठवड्यांत समिती शिफारस करणार
  • तोटा होत असल्याचे कारण देणारे महामंडळ संप काळात खासगी वाहनांवर मोठा खर्च करण्यासाठी आर्थिक नियोजन करत आहे

MSRTC workers Strike, MSRTC suspending more staffers मुंबईः महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तोडगा काढण्यासाठी शनिवार २० नोव्हेंबर २०२१ रोजी झालेली बोलणी फिस्कटली. एसटी महामंडळाचे (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) कर्मचारी मागण्यांवर ठाम आहेत. संप सुरू असल्यामुळे महामंडळाच्या प्रशासनाने आतापर्यंत २९३७ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला महाराष्ट्र शासनात विलीन करावे आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतनश्रेणी व भत्ते एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही द्यावे; अशी मागणी कर्मचारी करत आहेत. ज्यांचे पगार आणि भत्ते अद्याप थकीत आहेत अशांना महामंडळाने तातडीने थकबाकी द्यावी; अशीही कर्मचाऱ्यांची मागणी आहे. ज्या कर्मचाऱ्यांना संप काळात निलंबित केले आहे त्यांना परत सेवेत घ्यावी ही मागणी पण कर्मचाऱ्यांनी केली आहे. राज्य शासन आणि कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान तोडगा निघाला नाही. 

एसटी महामंडळाच्या सरकारी मान्यता असलेल्या संघटनेने संप पुकारलेला नाही पण मान्यता नसलेल्या आणि मोठी सदस्य संख्या असलेल्या इतर संघटनांनी संप सुरू ठेवला आहे. यामुळे एसटी महामंडळाची सेवा विस्कळीत झाली आहे. ज्या सदस्यांनी संप करण्याऐवजी काम सुरू ठेवले आहे त्या सदस्यांमुळे २० नोव्हेंबर रोजी एसटीने १४३ बस चालवल्या.

एसटीने शनिवार २० नोव्हेंबर २०२१ रोजी चालवलेल्या १४३ बसमध्ये ४६ शिवनेरी, ८३ शिवशाही आणि १४ साधारण बस होत्या. या बसमधून ४२८० जणांनी प्रवास केला. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने परीक्षा दिलेल्या पण अद्याप नोकरीत न घेतलेल्या अडीच हजार उमेदवारांना कंत्राटी पद्धतीचा करार करुन सेवेत सामावून घेणार असल्याचे संकेत दिले. महामंडळाने मोठ्या संख्येने खासगी बस तसेच त्या बससोबत खासगी चालक आणि वाहक यांना कंत्राटी स्वरुपात सेवेत घेऊन एसटी सेवा संप काळातही सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

तोटा होत असल्याचे कारण देणारे महामंडळ संप काळात खासगी वाहनांवर मोठा खर्च करण्यासाठी आर्थिक नियोजन करत आहे. या प्रकारामुळे संप करत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये महामंडळाच्या कारभाराविषयी आणखी नाराजी वाढली आहे.

एसटी महामंडळ विलीन करण्याबाबत बारा आठवड्यांत समिती शिफारस करणार

एसटी महामंडळ विलीन करायचे किंवा कसे याबाबत शिफारस करण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली आहे. ही समिती बारा आठवड्यांत आपला अहवाल देणार आहे. या अहवालाआधारे राज्य शासन पुढील निर्णय घेणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. हे आवाहन करतानाच एसटी महामंडळाने कर्मचारी निलंबन आणि खासगी वाहनांचे नियोजन ही प्रक्रिया सुरू ठेवली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी