Mumbai AC local train fare to be reduced by 50 percent: MoS Danve : मुंबई : उन्हाळा वाढत असला तरी एसी लोकलमधील प्रवाशांच्या संख्येत अपेक्षित वाढ झालेली नाही. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने एसी लोकलच्या तिकिटांच्या दरात मोठी कपात जाहीर केली आहे. यामुळे अधिकाधिक प्रवाशांना एसी लोकलच्या 'कूल' प्रवासाचा अनुभव घेणे शक्य होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या तिकिटांच्या दरात मोठी कपात केल्याचे जाहीर केले.
एसी लोकलच्या तिकिटांच्या दरांमध्ये पन्नास टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे एसी लोकलमधील २५ किमी प्रवासाकरिता आधी १३५ रुपये मोजावे लागत होते आता ६५ रुपये मोजावे लागतील. तसेच एसी लोकलमधील ५० किमी प्रवासाकरिता आधी २०५ रुपये मोजावे लागत होते आता १०० रुपये मोजावे लागतील.
तिकिटांच्या दरांमध्ये पन्नास टक्क्यांची कपात झाल्यामुळे एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला. उन्हाळ्याच्या दिवसांत वाजवी दरात वेगाने प्रवास करण्यासाठी एसी लोकल हा एक सुरक्षित आणि सुखकर पर्याय आहे. यामुळे एसी लोकलला मिळणाऱ्या प्रतिसादात वाढ होईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
एसी लोकलच्या तिकिटांच्या दरातील कपात कोणत्या दिवसापासून लागू होणार याची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. ही घोषणा होईपर्यंत अस्तित्वात असलेल्या दरानेच एसी लोकलमधून प्रवास करता येणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.