मुंबईतला २५२ कोटींचा कोस्टल रोड झाला १२७४ कोटींचा, कॅगने जाब विचारला

Coastal road गेल्या १० वर्षापासून सुरू असलेल्या कोस्टल रोडचे अखेर ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. २०२४ पर्यंत हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. परंतु हा मार्ग पूर्ण होण्यापूर्वीच वादात सापडला आहे.

cag question bmc
कॅगचा मुंबई महानगरपालिकेला सवाल 
थोडं पण कामाचं
  • मुंबईतला २५२ कोटींचा कोस्टल रोड झाला १२७४ कोटींचा, कॅगने जाब विचारला
  • ८ वर्षे या प्रकल्पाची एक वीटही रचण्यात आली नव्हती
  • कंत्राटदार आणि सल्लागारांना अतिरिक्त दिले पैसे

Coastal road मुंबईः गेल्या १० वर्षापासून सुरू असलेल्या कोस्टल रोडचे अखेर ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. २०२४ पर्यंत हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. परंतु हा मार्ग पूर्ण होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. या मार्गाची किंमत तब्बल ४०५ टक्क्यांनी वाढल्याने कॅगने मुंबई महानगरपालिकेला धारेवर धरले आहे. या प्रकल्पाची किंमत एवढी का वाढली असे कॅगने महानगरपालिकेला विचारणा केली आहे. २०११ मध्ये या प्रकल्पाची किंमत २५२ इतकी होती. २०१८ मध्ये या प्रकल्पाची किंमत १२७४ कोटी रुपये इतकी झाली आहे.

२०१६ ते २०२० दरम्यान एका निरीक्षण अहवालात खर्च झालेल्या २०० कोटी रुपयांवरही कॅगने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी २०१० साली कोस्टल रोडची योजना पुढे आली होती. त्यानुसार दक्षिण मुंबईच्या नरीमन पॉईंट ते मुंबई उपनगर कांदिवली दरम्यान एक ३५ किमी लांबीचा कोस्टल रोड तयार करण्यात येणार होता. परंतु ८ वर्षे या प्रकल्पाची एक वीटही रचण्यात आली नव्हती. अखेर २०१८ साली मुंबई महानगरपालिकेने मरीन ड्राईव्ह आणि वरळी जवळील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूलजवळ या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू केला. २०१८ साली सुरू झालेल्या या प्रकल्पाचा खर्च चांगलाच वाढला होता. लेखा परीक्षण विभागाने २०१६ ते २०२० झालेल्या या कामाच्या खर्चाचा लेखा परीक्षण विभागाने तपास केला आणि मुंबई महानगरपालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  

२०११ मध्ये या कोस्टल रोडच्या प्रति किमी रस्त्याची किंमत २५२ कोटी रुपये होती. २०१६ साली ३०४ तर तर २०१८ साली ६८६ तर शेवटी प्रति किमी रस्त्याला १२७४ कोटी रुपये लागल्याचे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले असून कॅग त्याचा अभ्यास करत आहे.

फायनल पेमेंट, दंडाची न झालेली वसूली, व्याजातून न मिळालेली रक्कम, कंत्राटदार आणि सल्लागारांना अतिरिक्त दिलेले पैसे  या संबंधित २०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. कॅगने यावरही प्रश्न विचारले आहेत. 

मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केल्यानंतरही जुलै २०१९ ते डिसेंबर २०१९ दरम्यान कंत्राटदारांना १४२ कोटी रुपये देण्यात आले होते. कॅगने या प्रकरणीही मुंबई महागरपालिकेला प्रश्न विचारले आहे.

१६ जुलै २०१९ ते १ जानेवारी २०२० दरम्यान कोस्टल रोडचे काम पूर्णपणे बंद होते. २ जानेवारी २०२० पासून कोस्टल रोडचे काम सुरू झाले. काम बंद असतानाही कंत्राटदारांना 142.19 कोटी रुपये देण्यात आले होते. काम बंद असतानाही कंत्राटदाराना पैसे का देण्यात आले असा सवाल कॅगने उपस्थित केला आहे.  

कॅगने मुंबई महानगरपालिकेला कोस्टल रोडच्या खर्चाप्रकरणी एकूण ८ प्रश्न विचारले होते. त्यापैकी पालिकेने काही प्रश्नांची उत्तरे दिली असून काही प्रश्नांची उत्तरे बाकी आहेत. १२०० कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या या प्रकल्पाचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी